white wagtail महाराष्ट्रात सर्वत्र आढळून येणारा परीट अर्थात धोबी हा पक्षी साधारणपणे बुलबुल या पक्ष्याएवढा असेल. तो स्थलांतरित पक्षी असू त्याची लांबी २१ सेंटीमीटर असते. सतत वरखाली होणारी शेपटी हे त्याचं वैशिष्ट्य असून, त्याचमुळे त्याला परीट किंवा धोबी असे नाव पडले. त्याची वरील बाजू, डोके, गळा, छाती व शेपटी काळ्या रंगाची असते. मात्र, छातीकडील बाजू पांढरी असल्याचे आपल्या लक्षात येते.
तसेच, भुवई सारखा डोळ्यांच्या वरा भागही पांढराच असतो. पंखांवरचे पांढरे पट्टे नजरेत भरतात. 'चीजेंट्' असा त्याचा काहीसा जोरकस आवाज आसमंतात घुमतो. मात्र, विणीच्या काळात मादी पक्ष्याचा तोच आवाज मधुर होऊन उल्हासित करतो. सोबतच शीळही घालतो. परीटांना शोधायचे झाल्यास नदी, तलाव,सरोवरे आणि पाटबंधाऱ्यानजीकच्या त्यांच्या अधिवासावर लक्ष ठेवावे लागेल. महाराष्ट्रातील विविध शहरे किंवा गावखेड्यांमधील जलाशयाजवळ हा पक्षी आपल्याला हमखास दिसून येतो. छोटे कीटक किंवा कोळी खाऊन परीट आपली भूक भागवतो. सर्वसामान्यपणे धोबी पक्ष्यांना माणसांच्या आसपास राहायला आवडते. बागेत आणि शेताजवळ तो दिसतो. कधी कधी जोडीने फिरणारा धोबी सदान्कदा किडे, चतुर, टोळ, नाकतोडे टिपत असतो. करडा आणि पिवळा अशा दोन रंगातही तो दिसतो.white wagtail तशा तर धोबी किंवा परीट पक्ष्याच्या १२ उपप्रजाती आहेत. विणीच्या काळात ते नदीपात्रातील खडकावर किंवा भिंतींच्या आडोशाने मुळ्या, केस, लोकर, चिंध्या, सुतळी, दोरे, सुकलेलं शेवाळ, गवत आदींच्या साहाय्याने घरटे बांधतात. या घरट्यात पिसे, लोकर किंवा केसांची मऊ गादी तयार करून मादी एका वेळेस तीन ते आठ अंडी घालते. नर व मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे आणि पिलांना वाढवण्याचे काम करतात. दोनेक आठवड्यात पिलांची पूर्ण वाढ होऊन ती स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम होतात.