विदर्भात आंबा लागवडीसाठी चांगले हवामान

25 Dec 2025 21:33:42
अमरावती,
sharad-gadakh : विदर्भात आंब्याचे क्षेत्र वाढायला भरपूर वाव असून केशर आंब्याला देशविदेशात मोठी मागणी आहे. एकात्मिक शेती पद्धतीत आंबा फार मोठे उत्पादन देऊ शकतो. विदर्भात आंबा लागवडीसाठी चांगले कृषी हवामान आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांनी आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
 
 
sharad
 
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या परिसरात गुरूवारी आयोजित आंबा परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन पुंडकर, अ‍ॅड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, सुरेश खोटरे, प्रा. सुभाष बनसोड, संस्था सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, प्राचार्य डॉ. अमोल महल्ले, विजय ठोकळ उपस्थित होते.
 
 
कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले, महाराष्ट्र हे कृषीत अग्रगण्य राज्य आहे. आपल्या राज्याची हार्टीकल्चर राज्य म्हणून ओळख आहे. एकचएक पिक पद्धतीमुळे जमिनीचे आरोग्य खालावले असून हवामान बदलाचा देखील शेतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे पिक बदल आवश्यक आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अगदी योग्यवेळी हा उपक्रम घेत असून ही अत्यंत अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षवर्धन देशमुख म्हणाले, कृषीचे उत्पन्न वाढल्या शिवाय भारताचा जीडीपी वाढणार नाही. संस्था भाऊसाहेबांच्या शेतीच्या संदर्भातील विचारांना बांधील असून त्या दृष्टीने कार्य करीत आहे. आमच्या कृषी महाविद्यालयांनी कृषी क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सुरु केले आहेत. पुढच्या वर्षी पुन्हा भव्य कृषी प्रदर्शनी घेण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
परिषदेचे मुख्य संयोजक प्राचार्य चंद्रशेखर देशमुख यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन डॉ. राजेश मिरगे तर रुरल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अभय ढोबळे यांनी आभार मानले. जे. डी. सांगळूद्कर महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या चमूने डॉ. राजेश उमाळे व डॉ. सुरेंद्र होजे यांच्या नेतृत्त्वात स्वागतगीत व गौरवगीत सादर केले. या परिषदेत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सुमारे दोन हजार शेतकर्‍यांनी याचा लाभ घेतला.
Powered By Sangraha 9.0