तीन पिस्तुलसह आरोपी अटकेत

25 Dec 2025 21:28:03
धारणी,
accused-arrested-with-a-pistol : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जंगलाला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्याच्या खकनार पोलिस ठाणे हद्दीतील पाचोरी या गावात अवैध शस्त्रे बनविण्याचे अनेक कारखाने घराघरात गृहउद्योगासारखे चालतात. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. २३ डिसेंबर रोजी धारणी तालुक्याच्या अगदी सीमेवरील तुकईथड (मध्य प्रदेश) जवळच्या झिरमिरी फाट्याजवळ एका संदिग्ध अवस्थेतील युवकाला पकडून ३ देशी कट्ट्े व एक मॅगजीन जप्त केल्याने एकच खळबळ माजलेली आहे.
 
 
amt
 
 
धारणी शहरापासून फक्त २४ कि. मी. अंतरावरील तुकईथड (एम. पी.) जवळच एका फाट्यावर पंजाबचा युवक पिस्तुली व मॅगजीन घेऊन उभा असल्याची माहिती खकनार पोलिसांना प्राप्त झाल्यावर ठाणेदार अभिषेक जाधव तथा सहाय्यक उपनिरीक्षक मनिषकुमार यांनी सापळा रचून संदीप काबलसिंग वय १९ रा. मंगली फरीदनगर, अमृतसर पंजाब यास मुद्देमालासह अटक केली. संदीपच्या बॅगेत ३ देशी बनावटीच्या पिस्तुली व एक मॅगजीन (एकूण किंमत १ लक्ष रुपये) सापडले. आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आली. हमराह फोर्सच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. संदीपसोबत किंवा त्याला मदत करणार्‍यांचा शोध खकनार पोलिस करीत आहे.
 
 
बर्‍हाणपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी (नेपानगर) निर्भयसिंग अलावा तथा ठाणेदार जाधव यांना मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र पोलिस पथकाचे अभिनंदन होत आहे. मेळघाटच्या जंगलास लागून असलेल्या पाचोरी (म. प्र.) गावातील शस्त्रनिर्मितीचे काम सुरू असल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. या कारवाईत सूर्यवंशी, अवस्थी, भटुरे व पाल यांनी भाग घेतला.
Powered By Sangraha 9.0