दर्यापूर,
cotton-money-bank : सीसीआयमार्फत कापूस विक्री केलेल्या शेतकर्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम थकित कर्जाच्या नावाखाली थेट कर्ज खात्यात वर्ग केली जात असल्याच्या तक्रारी तालुक्यात वाढल्या आहेत. शेतकर्यांचे आधार कार्ड ज्या बँकेत लिंक आहे, त्या बँकांकडून परस्पर कर्जवसुली केली जात असल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला जात आहे. या पृष्ठभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांनी तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी तसेच ल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती यांच्याशी थेट चर्चा करून निवेदन सादर केले.
कर्ज थकित असलेल्या शेतकर्यांच्या खात्यात जमा होणारी सीसीआयची रक्कम, शेतकरी अनुदान किंवा इतर कोणतेही शासकीय पैसे बँकांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग करू नयेत, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. यानंतरही जर कोणत्याही बँकेने अशी वसुली केली, तर संबंधित बँक अधिकार्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा स्पष्ट इशाराही युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांनी दिला आहे.
दरम्यान, शेतकर्यांचे पैसे कर्ज खात्यात वर्ग केल्यानंतर ते परत देण्यास बँक टाळाटाळ करत असल्यास, अशा पीडित शेतकर्यांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासन व बँकांनी तात्काळ स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.