भीषण अपघात! चारचाकी पुलावरून कोसळून 4 महिला ठार

25 Dec 2025 17:04:20
राजुरा,
car accident Rajura, नागपूरहून कागजनगरकडे जात असलेली चारचाकी राजुरा-तेलंगाना मार्गावरील सोंडो गावाजवळील पुलाखाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार, 24 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.
 
 
car accident Rajura,
 
तेलंगाना राज्यातील कागजनगर येथील निजामुद्दीन वसाहतीतील रहिवासी असलेल्या मृतक व जखमी हे नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीची प्रकृती बघायला 23 डिसेंबरला किरायाच्या आर्टीका कारने (टीएस 02 इएन 5544) गेले होते. बहिणीची प्रकृती बघून ते सर्व 24 डिसेंबरला नागपूर येथून कागजनगरकडे परतत असताना राजुरा-तेलंगाना मार्गावर सोंडो गावाजवळील पुलावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एकाच घरातील माय-लेकींचा सुद्धा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये (आई) सलमा बेगम (45), (मुलगी) अक्सा शबरीन (12) या मायलेकीसह अफजल बेगम (60), साहिरा बेगम (42) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी असलेल्या नुसरत बेगम (48), नजहत बेगम (50), शाहीन निशा (37), अब्दुल अरहान (7) व वाहन चालक अब्दुल रहमान यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातातील जखमी व मृतांना राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. वाहन चालक अब्दुल रहमान याच्याविरूध्द 281,225 (ब),106 (1), बीएनएस सह कलम 184 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.
 

भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू
मृतक सलमा बेगम (45) ही गृहिणी होती. तर अक्सा शबरीन (12) ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. मृत्यू पश्‍चात कुटुंबात वडील ऑटो चालक असून एक भाऊ बीकॉम द्वितीय वर्षात शिकत आहे. बहिणीची प्रकृती बघून नागपूर वरून घरी परत येताना काळाने अचानक काळाने घाला घातला आणि यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 

राष्ट्रीय महामार्गावरील ढिसाळ नियोजनाचे बळी
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम दिवस-रात्र सुरू आहे. परंतु कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनाचे प्रवासी बळी ठरत आहेत. रस्त्यांवर योग्य दिशादर्शक फलक नाहीत, कुठेही कसेही काम सुरू असते, धुळीने तर मागचे पुढचे काहीच दिसत नाही, कित्येकदा मोठमोठ्या यंत्रामुळे वाहतूक व्यवस्थेची कोंडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याची मर्यादा ठरविणारे फलक किंवा सीमांकन नसल्याने अनेकदा वाहतुकीचा रस्ता लक्षात येत नाही. या राष्ट्रीय महामार्ग बांधकामात कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. तर कंत्राटदार मनमर्जीने काम करीत असल्याने सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
Powered By Sangraha 9.0