कोहली-रोहितची शतके पाहता न आल्याने चाहत्यांचा उद्रेक!

25 Dec 2025 10:00:58
नवी दिल्ली,
centuries from Kohli and Rohit देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता विजय हजारे ट्रॉफीकडे लागले आहे. या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहिल्याच सामन्यात दोघांनीही दमदार शतकी खेळी करत आपापल्या संघांना विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या शतकामुळे दिल्लीने, तर रोहित शर्माच्या खेळीमुळे मुंबईने विजयाची चव चाखली. मात्र या ऐतिहासिक क्षणांचा आनंद प्रत्यक्ष पाहण्यापासून बहुतांश क्रिकेटप्रेमी वंचित राहिले.
 
 

rohitvirat 
या सामन्यांचे थेट प्रक्षेपण किंवा ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध नसल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मैदानात उपस्थित असलेल्यांनाच हे सामने पाहण्याची संधी मिळाली, तर देशभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना केवळ स्कोअर अपडेट्सवर समाधान मानावे लागले. त्यामुळे बीसीसीआयविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जाऊ लागला. या संतापात भर पडली ती बीसीसीआयने विराट आणि रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर. हा व्हिडीओ दर्जाहीन असल्याने चाहत्यांचा रोष अधिकच वाढला.
दरम्यान, बीसीसीआयच्या प्रचंड कमाईचे आकडे समोर आल्यानंतर हा संताप आणखी तीव्र झाला. क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयने २०२५ या वर्षात तब्बल ३,३५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ड्रीम इलेव्हनसोबतचा करार तोडूनही बोर्डाच्या उत्पन्नावर फारसा परिणाम झाला नाही. अपोलो टायर्स, अ‍ॅडिडाससारख्या मोठ्या कंपन्यांसोबत झालेल्या करारांमुळे बीसीसीआयची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे. आयसीसीकडून मिळणाऱ्या नफ्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी, एकूण उत्पन्नाच्या ३८.५ टक्के वाटा बीसीसीआयला मिळतो, जो इतर क्रिकेट बोर्डांच्या तुलनेत खूप जास्त आहे. इतकेच नव्हे, तर २०२५-२६ या आर्थिक वर्षात बीसीसीआय सुमारे ८,९६३ कोटी रुपयांची कमाई करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमी प्रश्न उपस्थित करत आहेत की इतकी अफाट कमाई करणाऱ्या बोर्डाला देशांतर्गत क्रिकेटचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी योजना आखता येत नाही का? आजकाल गल्लीबोळातील टेनिस क्रिकेटसुद्धा लाईव्ह दाखवले जाते, मग विजय हजारे ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेचे सामने, तेही विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असताना, थेट दाखवले जात नाहीत याचे आश्चर्य आणि संताप दोन्ही व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी बीसीसीआयने पैसा नेमका कुठे खर्च केला जातो, असा सवाल उपस्थित केला असून बोर्डाच्या प्राधान्यक्रमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0