देवळी,
Ramdas Tadas संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रात नंबर १ चा पक्ष बनला आहे. देवळी येथे सर्वात जास्त भाजपाचे १६ उमेदवार निवडून आले आहे. परंतु, नगराध्यक्ष आपला नसल्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे. देवळी नगराच्या विकासासाठी आपला मोठा हातभार लागणार आहे. आपण सर्वांनी एकत्र राहुन जनहिताच्या निर्णयाचे स्वागत व जनहिताच्या विरोधातील निणर्याचा विरोध करावा. निवडणुकी दरम्यान नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
भाजपा देवळी शहरच्या वतीने भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, जिल्हाध्यक्ष संजय गाते, मिलींद भेंडे, राहुल चोपडा, रवींद्र कारोटकर, उमेश कामडी, योगेश आदमने, विलास जोशी, नंदकिशोर वैद्य, मिलींद ठाकरे, किरण तेलरांधे, अंकीत टेकाडे उपस्थित होते.
देवळी शहराच्या विकासासाठी आमदार म्हणून आपल्या सर्व नवनिर्वाचीत सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आमदार राजेश बकाने यांनी दिले. तर संजय गाते म्हणाले, भाजपा विकासाचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला वर्धा जिल्ह्यात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सुद्धा जास्त सदस्य निवडून येईल यात शंका नाही. आपण भाजपाचे नगरसेवक म्हणून देवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी केले.यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक प्रमेंद्र ढोक, शितल तर्हेकर, अनिल कारोटकर, विलास जोशी, मनिषा लोखंडे, राहुल चोपडा, विभावरी बजाईत, संतोष भोयर, मंगला पिंपळकर, विजय गोमासे, विश्वजिता पोटदुखे, उमेश कामडी, शुभांगी कुरजेकर, सुरेखा कारोटकर, ललिता धुर्वे, ज्योती खाडे यांचा शाल, पुष्पगुच्छ व राम लक्ष्मण सितेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते.