मुंबई :
Disha Vakani लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरांत आपले स्थान निर्माण केले असले, तरी दया भाभी हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष जिव्हाळ्याचे ठरले. दया भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी या गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत दिसत नसल्या, तरी आजही त्या चाहत्यांच्या स्मरणात तितक्याच ताज्या आहेत.
अलीकडेच दिशा वकानी एका चाहत्याला अचानक भेटल्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दिशा एका लहान मुलीसोबत फोटो काढताना दिसत आहेत. गुलाबी रंगाचा फुलांचा साधा सूट, डोळ्यांवर चष्मा, नीट मांडलेले केस आणि अतिशय साधा, शांत स्वभाव – या व्हिडिओतून दिशा वकानींचा सादगीपूर्ण अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करून गेला. त्या मुलीशी आपुलकीने संवाद साधत फोटो काढल्यानंतर त्यांनी नम्रपणे नमस्कार केल्याचेही या व्हिडिओत दिसते.
हा व्हिडिओ Disha Vakani समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी दिशा वकानींच्या साधेपणाचे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. काही चाहत्यांनी “खऱ्या आयुष्यातही दया भाभी तितक्याच गोड आणि साध्या आहेत” अशा भावना व्यक्त केल्या, तर काहींनी “खूप दिवसांनी त्या दिसल्या, त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि आनंद दिसतो” असे म्हटले. याचबरोबर अनेक चाहत्यांनी आजही त्यांना मालिकेत परत येण्याची विनंती केली आहे.दिशा वकानी यांनी मुलीच्या जन्मानंतर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून विश्रांती घेतली होती. सुरुवातीला त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा होत्या, मात्र नंतर त्या दुसऱ्यांदा गरोदर राहिल्याने ही शक्यता लांबली. अखेरीस त्यांनी स्पष्टपणे मालिकेत परत न येण्याचा निर्णय जाहीर केला. सध्या दिशा वकानी सोशल मीडियापासूनही दूर असून कुटुंबासोबत शांत, साधे आयुष्य जगत आहेत. त्या आपला बहुतेक वेळ पती आणि मुलांना देत आहेत.
मालिकेतून दूर गेल्यानंतरही दया भाभीचे पात्र आणि दिशा वकानी यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. त्यांच्या एका छोट्याशा व्हिडिओनेही चाहत्यांच्या भावना पुन्हा जाग्या केल्या असून, ‘दया भाभी’ची आठवण प्रेक्षकांच्या मनात अजूनही तितकीच जिवंत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.