घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेतीची मागणी

25 Dec 2025 19:40:33
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
free-sand  : राळेगाव तालुक्यातील गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, तसेच तालुक्यातील रेती घाटांचा तातडीने लिलाव करावा, अशी मागणी शिवसेना राळेगावच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
 
 
 
ytl
 
 
 
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांतर्गत शेकडो लाभार्थी घरबांधणी करत आहेत. मात्र, रेतीच्या टंचाईमुळे अनेक घरकुले अर्धवट अवस्थेत असून बांधकामे पूर्णपणे ठप्प झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाकडून घरकुल मंजूर असतानाही मूलभूत बांधकाम साहित्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
 
 
रेती घाटांचा वेळेत लिलाव न झाल्यामुळे तालुक्यात कृत्रिम रेती तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे. अवैध मार्गाने व महाग दराने रेती खरेदी करण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली असून त्यामुळे गरीब नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यामुळे शासनाचा महसूलही बुडत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
शिवसेना राळेगावच्या वतीने शासन निर्णयानुसार सर्व शासकीय घरकुल लाभार्थ्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात रेती देण्यात यावी, तालुक्यातील सर्व पात्र रेती घाटांचा तत्काळ लिलाव करण्यात यावा, तसेच लिलाव होईपर्यंत विशेष परवानगीने रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
 
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास घरकुल लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना राळेगावच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
 
 
यावेळी शिवसेना जिल्हा विधानसभा प्रमुख जानराव गिरी, तालुका प्रमुख मनोज भोयर, भानुदास राऊत, इम्रान पठाण, प्रतीक बोबडे, अ‍ॅड. योगेश ठाकरे, गणेश कुडमेथे, इंदल राठोड, अनिल डंभारे, दीपक येवले, किशोर कापसे, शेख अनिस शेख अजीस, जीवन रामगडे, सागर वर्मा, मयूर जुमले, गोविंद काळे, प्रफुल्ल ननावरे, दिवाकर जवादे, भानुदास महाजन, चांदखा कुरेशी, राहुल पाटील, पार्थ काकडे, महेश राऊत, गीतेस अलंबकर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0