समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

25 Dec 2025 17:25:06
वर्धा,
Highway Traffic Management System हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग काही ठिकाणी ४५ ते ६० मिनीटांसाठी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. महामार्गावरून प्रवास करणार्‍या जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Highway Traffic Management System 
समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत किमी १०४+०८० ते किमी १२०+३०० ता. धामणगाव रेल्वे व ता. चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यात करण्यात येणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल.
त्यानुसार गॅन्ट्री Highway Traffic Management System उभारण्याच्या कामाकरिता शनिवार २७ रोजी दुपारी २ ते ३ किंवा दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान मुंबई वाहिनीवर नगरगावंडी गावाजवळ साखळी क्रमांक १०४.०८० तसेच १०५.०५० येथे मार्ग बंद राहील. रविवार २८ रोजी दुपारी २ ते ३ किंवा दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान नागपूर वाहिनीवर नगरगावंडी गावाजवळ साखळी क्रमांक १०५.०६५ येथे मार्ग बंद राहील.सोमवार २९ रोजी सकाळी ११ ते १२ किंवा दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान नागपूर वाहिनीवर टिटवा गावाजवळ साखळी क्रमांक १२०.३०० येथे मार्ग बंद राहील. तर दुपारी ३ ते ४ किंवा सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान मुंबई वाहिनीवर टिटवी गावाजवळ साखळी क्रमांक १२०.३०० येथे मार्ग वाहतुकीकरिता ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः थांबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0