अमरावती,
kaundanyapur-rukmini-peeth : विदर्भाची पुरातन राजधानी, रुक्मिणी मातेचे माहेरघर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील जगत्गुरू रामराजेश्वर महाराज यांच्या अंबिकापूर रुक्मिणी पीठाला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त झाला. याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच अंबा रुक्मिणी महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. याबाबतचे पत्र प्राप्त होताच रविराज देशमुख यांनी रामराजेश्वर महाराज यांना शाल, श्रीफळ व शासनाकडून मिळालेले ‘क’ दर्जाचे पत्र देऊन सन्मानित केले.

मागील अनेक दिवसांपासून रविराज देशमुख यांनी कौंडण्यपूर-अंबिकापूर येथील रुक्मिणी पीठाला क तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. कौंडण्यपूर जवळच असलेल्या अंबिकापूर येथील जगत्गुरू राजेश्वर महाराज यांच्या पीठाच्या माध्यमातून कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेचा प्रचार व प्रसार सातत्याने होत असून या शुभ कार्यासाठी शासनाने त्यांना क दर्जा दिला आहे. महाभारतातील भगवान श्रीकृष्णाचे सासर आणि रुक्मिणी मातेचे माहेरघर म्हणून जगात प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर या नगरीला भव्य कॉरिडॉर साकारण्यासाठी विविध उपक्रमातून तसेच अंबा रुक्मिणी महोत्सवाच्या माध्यमातून रविराज देशमुख यांचे अविरत प्रयत्न सुरू आहे. नुकतेच शासनाने कौंडण्यपूर नगरीला शक्तीपीठ महामार्गाशी जोडल्याचे पत्र सुद्धा रविराज देशमुख यांना प्राप्त झाले.