अग्रलेख
kidney smuggling चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावचा तरूण शेतकरी रोशन कुडेच्या किडनी विक्रीचे प्रकरण महाराष्ट्राला हादरा देणारे होते. त्यामुळे या तपासानेही वेग घेतला आणि या आंतराष्ट्रीय जाळ्याचा पर्दाफाश होण्याच्या दिशेने पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला. या प्रकरणाचा मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशाम सुंचू यास सोलापूरहून अटक करण्यात आली. त्याने कुडे यांच्यासह सोळा जणांच्या किडनी कंबोडियात विकल्याची माहिती पुढे आली. आरोपी अभियंता असला तरी त्याने या मानवी तस्करीच्या रॅकेटमध्ये स्वतःचे ‘डॉ. क्रिष्णा’ असे नामाभिधान केले होते. कर्जबाजारी शेतकरी, बेरोजगार युवक आणि आर्थिकद्दष्ट्या कमकुवत अशा लोकांना तो हेरायचा आणि त्यांना किडनी विकण्याच्या मार्गावर घेऊन जायचा. रोशन कुळे हा त्यातीलच एक बळी. अशा 16 जणांना ‘डॉ. क्रिष्णा’ने किडनी विक्रीसाठी बाध्य केल्याचे आता समोर आले आहे. प्रत्येक किडनी मागे त्याला 1 लाख रूपये दलाली मिळायची. विशेष म्हणजे, रामकृष्ण सुंचू यानेही यापूर्वी आपली किडनी अशीच विकली होती! व्यवसायात अपयश आल्याने 2015 मध्ये तो स्वतः समाजमाध्यमावरील ‘किडनी डोनर’च्या माध्यमातून तस्करांच्या संपर्कात आला.

पुढे याच रॅकेटमध्ये तो दलाल म्हणून सामिल झाला. उच्चशिक्षण असल्याने आणि इंग्रजीवर त्याचे प्रभुत्त्व असल्याचे त्याला ते सहज जमले. पुढे ‘डॉ. क्रिष्णा’ नावाने तो या अवैध व्यवसायाचा एक भाग झाला. 2018 ते 2025 पर्यंत तो पाच वेळा कंबोडियात जाऊन आला आहे. त्याच्यासोबत चंदीगड आणि पश्चिम बंगालचे दोन अन्य सहकारीही असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. कंबोडियातील पनॉम पेन येथील प्रेआ केट मेअलिया या रूग्णालयात या रॅकेटच्या माध्यमातून रोशन आणि अन्य सोळा जणांची किडनी काढून विकली गेली. या रूग्णालयाचा पूर्वइतिहास काही चांगला नाही. किडनी तस्करीचे अनेक प्रकरणे तेथे उघडकीस आली आहेत. 2014 मध्ये अशाच एका कांडात या रूग्णालयाचे संचालक, उपसंचालक आणि कंबोडियन डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या चिनी प्राध्यापकाला अटक झाली होती. याचाच अर्थ असा की, किडनी विक्रीचे हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक आणि सक्रिय आहे. मानवी अवयवांचा बाजार मांडणाऱ्या अशा कुठल्याही प्रयत्नांना आता ठेचूनच काढले पाहिजे आणि त्यादिशेने विशेष पोलिस पथकाचा तपास वेगाने मार्गस्थ होत आहे यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
सावकारी पाश तोडण्यासाठी रोशन कुळे या शेतकऱ्याने स्वतःच्या शरिराचा तुकडा विकण्याचा घेतलेला आत्मघातकी निर्णय खरे तर आपल्या समाजव्यवस्थेचे फार मोठे अपयश मानले पाहिजे. पण त्याहूनही भयंकर आहे ती ‘डॉ. कृष्णा’ नावाच्या संधीसाधूनी चालवलेली आंतरराष्ट्रीय टोळी, जी माणसाच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्या अवयवांचा अक्षरशः बाजार मांडते. ही केवळ शेतकèयाची, गरिबांची फसवणूक नव्हे, तर अवघ्या मानवतेविरुद्ध पुकारलेला जिहाद आहे.
भारतात यापूर्वीही अशा टोळ्यांनी उच्छाद मांडला होता. 2008 मधील गुडगावचे अमित कुमार रॅकेट असो, की 2020 मधील कानपूरचे अवयव तस्करीचे प्रकरण असो, की मग अलिकडच्या काळातील नेपाळ-भारत सीमा भागातील जाळे असो, या सर्वांची काम करण्याची पद्धत सारखीच आहे. शिवाय या साऱ्या प्रकरणांत एक समान धागा असाही आहे आणि तो म्हणजे, सारेच पीडित कायम गरीब, कर्जबाजारी आणि उपेक्षित वर्गातील आहेत. आताही ‘डॉ. कृष्णा’ने रोशन सारखा सावकारी कर्जात पिचलेला, कर्जबाजारी सावज निवडला. समाजमाध्यमांत ‘किडनी हवी आहे’ किंवा ‘गरजूंनी संपर्क साधावा’ असे निरोप प्रसारित करून अडचणीत सापडलेले लोकं शोधले जातात. जेव्हा एखादा गरजू, गरीब ‘व्हॉट्सअप’वर ‘किडनी सेल’ शोधतो, तेव्हा हे जाळे सक्रिय होतात. पुढे मानवी लचके तोडण्यासाठीची सारी प्रक्रिया अगदी सोपी होत जाते. काम झाले की तुटूपुंजे पैसे हाती ठेवून पीडितांना परत पाठवले जाते. रोशनला तर परतीचाही त्रास झाला होता. त्याला तेथे कामेही करावी लागली होती म्हणे!
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार, मानवी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असली, तरी अवयव तस्करीचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत होत चालले आहे. ‘ग्लोबल फायनॅन्शिअल इंटिग्रिटी’च्या अहवालानुसार, जगभरातील अवयव तस्करीच्या व्यापारातून दरवर्षी अंदाजे 840 दशलक्ष ते 1.7 अब्ज इतकी मोठी उलाढाल होते. एकूण प्रत्यारोपणापैकी 10 टक्के अवयव ही तस्करीतून आलेली असतात. भारतात दरवर्षी हजारो लोक किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यूशी झुंज देतात. पण त्यांना कायदेशीर दाता मिळणे दुरापास्त होते. मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नाही. त्यातून मग हा काळाबाजार फोफावतो. प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था जेव्हा असे दाते मिळवून देण्याची प्रक्रिया सोपी करण्यात अपयशी ठरते, तेव्हा ‘डॉ. क्रिष्णा’सारख्या दलालांचे आणि कंबोडियातील पनॉम पेनच्या प्रेआ केट मेअलिया अशा रूग्णालयांचे फावते.kidney smuggling
भारतात अवयवांची खरेदी-विक्री हा अजामीनपात्र गुन्हा आहे. पण चंद्रपूरच्या प्रकरणात केवळ याच कायद्याचे उल्लंघन झाले नाही, तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 143 अंतर्गतही गंभीर गुन्हा घडला आहे. एखाद्या व्यक्तीची हतबलता ओळखून, त्याला फसवून परदेशात नेणे आणि तिथे त्याचे अवयव काढणे ही शुद्ध ’ह्यूमन ट्रॅफिकिंग’ आहे. अशा आरोपींना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा व्हायला हवी.
कंबोडिया, इजिप्त किंवा व्हिएतनामसारख्या देशांत जेथे कायदे थोडे शिथिल आहेत, तिथे रुग्णाला आणि दात्याला नेले जाते. हे देश एव्हाना ‘ऑर्गन टुरिझम’चे केंद्र बनले आहेत. कंबोडियातील अशा रूग्णालयाचे जाळे भारतात कुठवर पसरले आहे, याचे धागेदोरे ‘इंटरपोल’च्या मदतीने शोधण्याची गरज आहे. केवळ ‘डॉ. कृष्णा’सारख्या दलाला पकडून हे रॅकेट थांबणार नाही, तर त्यामागचे मुख्य सूत्रधार जे ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगार आहेत, त्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे. या साऱ्यावर सातत्याने सायबर पाळत ठेवण्याचीही गरज आहे. समाजमाध्यमाच्या कंपन्यांनी ‘किडनी विक्री’ सारख्या ‘पोस्ट’वर तत्काळ बंदी घातली पाहिजे. चंद्रपूरचे किडनी विक्री प्रकरणाकडे आता केवळ एका गुन्ह्याचा तपास म्हणून न पाहता ती यंत्रणेच्या शुद्धीकरणाची संधी म्हणूनही बघितली पाहिजे. कुणीही कुणाच्या अवयवाचा बाजार मांडू नये यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी व्हायला हवी. मानवी शरिराचे भाग हे विकायची वस्तू नसून, ती निसर्गाची देणगी आहे. कंबोडियापर्यंत पसरलेले हे रॅकेट जर आजच नेस्तनाबूत झाले नाही, तर भविष्यात गरिबांचे शरीर हे श्रीमंतांच्या जगण्याचे केवळ ‘स्पेयर पार्ट’ बनून राहील. सरकारने या प्रकरणी विशेष तपास पथक नेमला आहेच, पण त्याची व्याप्ती आणखी वाढवली पाहिजे. आंतरराष्ट्रीयस्तरावर या तस्कारांना ठेचले पाहिजे, हीच पीडित रोशन आणि त्याच्यासारख्या हजारो तरुणांना न्याय देणारी कृती ठरेल.
सध्या पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात असून, तो कौतुकास्पद असला तरी, तपासादरम्यान समोर आलेली 16 जणांनी किडनी विकल्याची संख्या ही केवळ हिमनगाचे टोक आहे. कर्जबाजारी शेतकरी, बेरोजगार तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लक्ष्य करणे, त्यांना परदेशात नेऊन तिथे बऱ्याच वेळा बळजबरीने त्यांचे अवयव काढणे हे या टोळीचा अवैध व्यवसाय आहे. रोशनसारख्या अनेक तरुणांना फसवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा व्यवसायाचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीयस्तरावर पसरले आहे, हे तपासातही अधोरेखित झाले आहे. त्यामुळे ते एकदाच मुळासकट उखडून फेकले पाहिजे. सोबतच सावकारी पाश आवळणे हीसुध्दा समाजाची गरज आहे. कारण जोपर्यंत शेतीतील तोटा आणि अवैध सावकारांची दहशत संपत नाही, तोपर्यंत रोशन कुळे यांच्यासारखे तरुण अशा रॅकेटचे बळी पडतच राहतील. जसे, एकेक ‘रोशन’ शोधून काढावे लागतील. तसेच आता एकेक ‘डॉ. क्रिष्णा’ही शोधून काढले पाहिजे.
===========================