'मला अल्लाहने सांगितले म्हणून मी...' एकतर्फी प्रेमात दीर शिरला वहिनीच्या खोलीत, आणि...

25 Dec 2025 15:55:20
अहमदाबाद,
one-sided love crime : वहिनीवर एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने छेडछाडीचा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेले कारण सर्वांनाच चकित करणारे आहे. “अल्लाहने सांगितले म्हणून मी तिचा हात ओढला,” असं तो वारंवार पोलिसांना सांगत आहे.
 
 
 
UP
 
उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला 46 वर्षीय एहराज हुसेन तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे आला होता. तो जमालपूर भागात राहत होता आणि आपल्या मावशीकडे वारंवार ये-जा करत होता. 2024 पासून त्याने मावशीच्या सुनेचा, म्हणजेच वहिनीचा पाठलाग सुरू केला. या वागणुकीला विरोध झाल्यानंतर एहराजने थेट त्या महिलेच्या पतीला सांगितले की तो तिच्यावर प्रेम करतो, तिला पाहण्यासाठी पाठलाग करतो आणि पुढेही करत राहणार आहे. कोणी अडथळा आणला तर ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
 
या प्रकरणी 2024 मध्ये दाणीलीमडा पोलीस ठाण्यात एहराजविरोधात एफआयआर दाखल झाली होती आणि सध्या कोर्टात खटला सुरू आहे. मात्र जामिनावर सुटून आल्यानंतरही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. त्याने पुन्हा त्या महिलेचा पाठलाग सुरू केला. 23 डिसेंबर रोजी तो थेट मावशीच्या घरी गेला. घरातून हाकलून दिल्यानंतरही तो थांबला नाही. त्याने वहिनीचा हात पकडत, “मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत चल. माझ्यावर दाखल केलेला केस चुकीचा आहे, तो कोर्टात जाऊन मागे घे,” असा दबाव टाकला.
 
यावेळी तो महिलेला जबरदस्तीने ओढून नेत होता. तिच्या सासूने हस्तक्षेप करून तिला सोडवले. यानंतर संतप्त झालेल्या एहराजने महिलेच्या पतीची हत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने गायकवाड हवेली पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा छेडछाडीची तक्रार दाखल केली.
 
पोलीस कोठडीत असलेल्या एहराज हुसेनचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, त्याला अनेक वेळा आवाज ऐकू आले. दिवाळीच्या सुमारास आणि त्यानंतरही त्याला स्वप्नात व आवाजात “एहराज, जा आणि तिला ओढून आण” असं सांगितलं गेलं. शुक्रवारी अजान सुरू असताना देखील त्याला हा आवाज ऐकू आल्याचा दावा तो करत आहे. हा आवाज अल्लाहचा असल्याचं तो सांगतो आणि त्याच आदेशावरून आपण हे कृत्य केल्याचं त्याचं म्हणणं आहे.
 
या प्रकरणाबाबत एसीपी वाणी दुधात यांनी माहिती दिली की, दाणीलीमडा परिसरातील एहराज हुसेनविरोधात महिलेचा पाठलाग करणे, धमकावणे आणि कोर्टातील केस मागे घेण्यासाठी दबाव टाकणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एहराज महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. यापूर्वीही त्याने तिची छेडछाड केली होती, ज्याचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0