दिल्ली वार्तापत्र
rahul gandhis लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा प्रत्येक परदेश दौरा वादग्रस्त ठरत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक परदेश दौरा वादग्रस्त ठरवण्यात अन्य कोणाचे नाही तर राहुल गांधी यांचेच योगदान असते. त्यानुसार त्यांचा यावेळचा जर्मनीचा दौराही असाच वादग्रस्त ठरला. यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर गेले. खरं म्हणजे संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरही ते जर्मनीच्या दौऱ्यावर गेले असते तर आकाश कोसळले नसते. संसदेचे अधिवेशन सुरु असतांना विरोधी पक्षनेत्याने परदेश दौऱ्यावर जाऊ नये, असा काही नियम नाही, पण संकेत मात्र निश्चित आहे. संसद अधिवेशन काळातील राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे समर्थन करतांना काँग्रेस पक्षाने संसदेचे अधिवेशन सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या परदेश दौऱ्याचाच दाखला दिला. पण मोदी यांचा परदेश दौरा व्यापक देशहितासाठी असतो, तर राहुल गांधी यांचा परदेश दौरा देशाला अडचणीत आणण्यासाठी, देशाची बदनामी करण्यासाठी असतो, याचे काँग्रेस पक्षाला सोयीस्कर विस्मरण झाले.
बरं जर्मनीत जाऊन राहुल गांधी यांनी दिवे तरी काय लावले, तर आपल्याच देशावर टिका केली, देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. बर्लिन येथे हर्टी स्कूलमध्ये रााजकारण एक ऐकण्याची कला, या विषयावर ‘डर्टी’ भाषण करतांना राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा मांडला आणि हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. भारतातील संवैधानिक संस्थावरही त्यांनी नेहमीसारखे आरोप केले. असे आरोप राहुल गांधी यांनी आतापर्यंत किमान शंभरवेळा तरी केले असावे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी संसदेत असे आरोप करायला हरकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण परदेशात जाऊन आपल्या देशावर आरोप करत राहुल गांधी यांनी एकप्रकारे संकेतभग आणि औचित्यभंग केला आहे. देशात असतांना शंभर आणि पाच असे वेगवेगळे असले तरी हरकत नसते, मात्र परदेशात गेल्यावर शंभर आणि पाच यांनी एकशेपाच मिळून वागायचे असते, किमान तसे दर्शवायचे तरी असते. पण राहुल गांधी यांना असे औचित्य आणि संकेतांचे भान कधी राहात नाही.
विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना मायदेशात पंतप्रधान तसेच सरकारवर टिका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार कोणी नाकारत नाही, मात्र परदेशातच्या भूमीवरुन देशाच्या पंतप्रधानांवर टिका करण्याचा तसेच देशाची बदनामी करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. मुळात मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी जे आरोप केले, ते देशातील जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, त्यामुळे आपल्या जुन्या आरोपांची पुनरावृत्ती करण्याचे त्यांना कारण नाही. असे करत राहुल गांधी स्वत:ची तसेच विरोधी पक्षनेतेपदाची विश्वसनीयता कमी करत आहे. मुळात आपण काय बोलतो, त्याचा परिणाम काय होतो, याचे भान राहुल गांधी यांना राहात नाही, असे म्हणावेसे वाटते.
मागील वर्षी राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यातही त्यांच्या विधानावरुन वादळ उठले होते. भारतात अल्पसंख्यकांना असलेल्या धार्मिक अधिकारबाबत बोलातंना राहुल गांधी यांनी चुकीचा संदर्भ दिला होता. शिखांना पगडी घालण्याची परवानगी आहे का, गुरुद्वारात कडा घालून जाण्याची परवानगी आहे का, वा वाद फक्त शिखांशी संबंधित नाही तर भारतातील सर्व अल्पसंख्यकांशी संबंधित आहे, असे तारे राहुल गांधी यांनी तोडले होते.एकप्रकारे राहुल गांधी यांनी भारतात अल्पसंख्यकांवर धार्मिक आधारावर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता.
भारतात शीख नागरिकांना पगडी आणि कडा घालण्याची पूर्वापार परवानगी आहे, अगदी विमानप्रवासातही ते आपल्या जवळ कृपाण बाळगू शकतात. त्यामुळे भाजपानेच नाही तर शीख नागरिक तसेच त्यांच्या सर्व संघटनांनीही राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. राहुल गांधी यांच्या या बिनडोक आरोपाचा फायदा घेत खलिस्तानवादी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याने, म्हणूनच आमची खलिस्तानची मागणी न्याय असल्याचा दावा केला होता.
अमेरिका दौèयात राहुल गांधी यांनी भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जाणारे खासदार इल्हान उमर यांची भेट घेतली होती. इल्हान उमर यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये भारतविरोधी प्रस्ताव मांडला होता, तसेच 370 कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. परदेशात जाऊन देशावर टिका करु नये, असा कायदा नसला तरी तो संकेत आहे. देशात सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्ष असे विभाजन असते, परदेशात मात्र सगळे फक्त आणि फक्त भारतीय असतात. त्यामुळे तुम्ही आपल्या देशाची बदनामी होईल, अशी टिका करु शकत नाही. राहुल गांधी हे सर्व अनावधानाने करतात की जाणिवपूर्वक ते कळायचा मार्ग नसला तरी आपल्या देशविरोधी कृतीने आणि विधानाने ते देशाची बदनामी करतात, हें कसे नाकारता येईल.
असा प्रकार एखादवेळी झाला तर समजण्यासारखे आहे, पण राहुल गांधी वारंवार त्यांची पुनरावृत्ती करतात. असे करत राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नुकसान करतात. राहुल गांधी यांच्या देशविरोधी कृत्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्यांचीच नाही तर काँग्रेस पक्षातील नेत्यांचीही अडचण होत आहे. त्यामुळे त्यांच्या अशा बेजबाबदार विधानांपासून इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे नेते आणि काँग्रेस पक्षातील नेतेही स्वत:ला दूर ठेवत आहे.rahul gandhis विरोधी पक्षनेता हे संवैधानिक पद आहे, त्यामुळे या पदावर विराजमान होणाèया व्यक्तीकडून देशातील नागरिकांच्या खूप अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात राहुल गांधी कमी पडत आहे.
मुळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारतांना राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य, अधिकार आणि जबाबदारी यांचा अभ्यास करायला पाहिजे होता. यासोबत देशात आतापर्यंत कोणकोण विरोधी पक्षनेते्रझाले, त्यांची सभागृहातील तसेच सभागृहाबाहेरील वागणूक कशी होती, याचा अभ्यासही करायला पाहिजे होता.
काँग्रेस सांसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी पुत्रप्रेमामुळे आंधळ्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना राहुल गांधी कधीच चुकत नाही, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण काँग्रेस पक्षात राहुल गांधींपेक्षा अनुभवी, विद्वान असे अनेक नेते आहेत. त्यांनी राहुल गांधींना समजवून सांगण्याची गरज आहे. कोणताही लहान मुलगा बोलायला लागतो, तेव्हा तो तोतडा बोलत असतो, चालतांना अडखळत असतो. सुरुवातीला याचे सर्वांना कौतुक वाटते. पण लहान मुलगा थोडा मोठा झाल्यावरही तोतडा बोलत असेल आणि अडगळत चालत असेल तर त्याला डॉक्टरकडे नेण्याची गरज असते. राहुल गांधी यांची स्थिती मोठा झाल्यावरही तोतड बोलणाèया लहान मुलासारखी झाली आहे. त्यामुळेच ते हास्यास्पद ठरत आहे.
राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून जे आरोप करायचे ते त्यांनी देशात केले पाहिजे, महत्वाचे म्हणजे जे आरोप करायचे ते पुराव्यानिशी केले पाहिजे. उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारचे आरोप करु नये. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतचोरी झाली, काही गैरप्रकार झाले, असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे, पण निराधार आणि खोडसाळ आरोप करत देशाची तसेच देशातील संवैधानिक संस्थाची बदनामी करु नये. जनतेच्या सहनशक्तीची आणि संयमाची परीक्षा पाहू नये, असे सांगावेसे वाटते. त
श्यामकांत जहागीरदार
9881717817
.........................................