घाटबांधे यास 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

25 Dec 2025 20:08:01
चंद्रपूर, 
roshan-kule-kidney-selling-case : शेतकरी रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सावकार मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (42, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी) यास गुरूवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू (36) उर्फ ‘डॉ. क्रिष्णा’ याच्या पोलिस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
 
 

chand 
 
 
 
नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील तरूण शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी कंबोडियात विकली होती. हे प्रकरण उघडकीस येताच, ब्रम्हपुरी पोलिसांनी कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी 6 अवैध सावकरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यातील 5 आरोपींना तात्काळ अटक झाली. मात्र, आरोपी मनिष घाटबांधे पुढील सात दिवस फरार होता. पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. वैद्यकीय तपासणी करून गुरूवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
किडनी विक्रीच्या रॅकेटचा आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू (36) जो, ‘डॉ. क्रिष्णा’ नावाने पीडितांच्या संपर्कात होता, त्याला 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली होती. त्याची पोलिस कोठडी संपताच, न्यायालयाने त्याच्या कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी, जो कंबोडियात किडनी विक्रीसाठी पीडितांना सोबत करायचा, तो हिमांशु भारद्वाज (रा. चंदीगढ, पंजाब) यास चंदीगडहून अटक करण्यात असून, त्याची आधीच 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी रवानगी करण्यात आली आहे.
 
जनाक्रोश मोर्चासाठी उद्या बैठक
 
 
शेतकरी रोशन कुळे यांना न्याय मिळण्याकरिता यासाठी बच्चू कडू व सामाजिक संघटनांच्या नेतृत्वात 3 जानेवारी 2026 रोजी मिंथूर ते नागभीड जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या नियोजनाकरिता शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता ब्रम्हपुरी येथे बैठक होणार आहे.
Powered By Sangraha 9.0