वर्धा,
Sindiwihiri village, मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण तसेच मध आणि मधमाशांपासून मिळणार्या उत्पादनावर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून मधुपर्यटन वाढविण्यासाठी कारंजा तालुयातील सिंदीविहिरी गावाची निवड करण्यात आली आहे. या गावात मधाचे गाव योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीत दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकार्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी. आर. गाडेकर, सहाय्यक वनरक्षक हरीलाल सरोदे, जिपचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, ग्रामविस्तार अधिकारी एस. एल. शिंदे, उपसरपंच बंडू युवनाते, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. एल. राऊत, मधुक्षेत्रिक आर. पी. मनोहरे, पर्यवेक्षक एस. आर. पांडे आदी उपस्थित होते.
सिंदीविहिरी Sindiwihiri village, गावात सामूहिक सुविधा केंद्रासाठी ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत जागा उपलब्ध करून द्यावी. मधमाशी विषयी माहिती देणारे विशेष दालन आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात यावे. मधाच्या गावांची सर्वदूर प्रसिद्धी व जनजागृती करावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
राज्यातील १० गावांमध्ये मधाचे गाव योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली असून यात वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहिरी गावाचा समावेश आहे. या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून ६८ तरुणांची प्रशिक्षणाकरिता निवड यादी ग्रामोद्योग कार्यालयास प्राप्त करून देण्यात आली आहे. या तरुणांना मधमाशी पालनातून कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मध संकलन, प्रक्रिया, ब्रँन्डीग, पॅकींग तसेच मध मेण पराग यापासून विविध उत्पादने तयार करण्याचे तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिल्या. बैठकीला सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.