...तर सैन्य पाठवा, पण हिंसाचार थांबवा!

25 Dec 2025 12:36:42
नवी दिल्ली,
Tharoor criticized the Yunus government बांगलादेशात घडत असलेल्या हिंसाचारावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारला थेट इशारा दिला आहे. हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर बोलताना थरूर म्हणाले की, देशातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे आणि हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत थांबला पाहिजे. जर पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात येत नसेल, तर लष्कराची मदत घ्यावी, मात्र हिंसाचार सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
 
 
Tharoor criticized
 
केरळमधील तिरुवनंतपुरमचे खासदार असलेल्या थरूर यांनी बांगलादेशच्या मैमनसिंग जिल्ह्यात ईशनिंदेच्या आरोपाखाली कट्टरपंथी जमावाने दीपू चंद्र दास यांची मॉब लिंचिंग करून नंतर त्यांना जाळल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला. या घटनेविरोधात भारतात सुरू असलेल्या देशव्यापी निदर्शनांना त्यांनी समर्थन दिले. त्यांनी स्पष्ट केले की भारतातील निषेध आंदोलन अहिंसक आहेत आणि कुठेही लिंचिंग किंवा दंगली झालेल्या नाहीत. लोकशाहीत निषेध व्यक्त करणे हा नागरिकांचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. थरूर यांनी भारत आणि बांगलादेशमधील परिस्थितीची तुलना करताना सांगितले की भारतात निदर्शने होत असली तरी पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था राखली जाते. याचप्रमाणे बांगलादेश सरकारकडूनही अशीच ठोस कारवाई अपेक्षित आहे. केवळ खेद व्यक्त करणे किंवा निषेध नोंदवणे पुरेसे नाही, तर रस्त्यांवर सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी प्रत्यक्ष आणि प्रभावी पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. लोकांना पुन्हा सुरक्षित वाटले पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले.
 
 
 
बांगलादेशातील अनियंत्रित परिस्थितीवर बोलताना थरूर यांनी युनूस सरकारला कठोर शब्दांत फटकारले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारने जे काही आवश्यक असेल ते करावे, पण हिंसाचार थांबवायलाच हवा. “जर पोलिस अपयशी ठरत असतील, तर सैन्य पाठवा, पण हा मूर्खपणा थांबवा,” असे थरूर म्हणाले. दरम्यान, युनूस यांनी दीपू चंद्र दास यांच्या हत्येचा निषेध करत या प्रकरणात काही अटक झाल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर भारतात तीव्र संतापाची लाट उसळली असून देशभरात निषेध आंदोलन सुरू आहेत. यामुळे भारत-बांगलादेश संबंधांवरही ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, अशा तणावपूर्ण वातावरणातही बांगलादेशने तांदळाच्या तुटवड्यामुळे भारताकडे मदतीची मागणी केली आहे. पाकिस्तानकडून अपेक्षित मदत मिळू न शकल्याने बांगलादेश पुन्हा भारतावरच अवलंबून असल्याचे चित्र समोर आले आहे.
Powered By Sangraha 9.0