शनिवारी खुले होणार बोरचे अडेगाव गेट

25 Dec 2025 14:39:45
वर्धा, 
bor tiger reserve gate वन्यजीवांसाठी नंदनवन असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. या प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेटी देतात. मान्सून कालावधी संपल्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्पाचे बोरधरण येथील गेट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, अडेगाव येथील गेट काही कारणास्तव खुले करण्यात आले नव्हते. २४ डिसेंबरला बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालकांनी पाहणी केल्यानंतर हे गेटसुद्धा पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार २७ डिसेंबरपासून बोर व्याघ्र प्रकल्पाचे अडेगाव येथील गेट जंगल पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे.
 

बोर व्याघ्र प्रकल्प  
 
 
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे एकसंघ नियंत्रण झाल्याने बफर क्षेत्र वन्यजीव विभागाकडे वळते करण्यात आले आहे. १३ हजार ८०० हेटर कोअर तर ६७ हजार ८१४.४६ हेटर बफर क्षेत्र असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाला सिने सृष्टीतील अनेक दिग्गज तसेच विविध व्हीव्हीआयपींनी भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. सध्या या व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीसह तिच्या दोन पिलांचे दर्शन जंगल सफारीसाठी येणार्‍या पर्यटकांना होत आहे. आपल्या नैसर्गिक अधिवासात आईच्या अवती-भवती राहून मस्ती करणार्‍या या दोन पिलांचे दर्शन झालेल्या निसर्ग प्रेमींकडून त्यांना ‘करण’ आणि ‘अर्जून’ असेच लाडाने संबोधले जात आहे.bor tiger reserve gate अशा या जैवविविधतेने नटलेल्या आणि पट्टेदार वाघांच्या संवर्घनासाठी उपयुत ठरत असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाचे अडेगाव येथील गेट बोर धरणाचे बॅक वॉटर पर्यटन रस्त्यावर आल्यामुळे १ ऑटोबरपासून बंद होते. २४ रोजी बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी बोरधरणचे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांसह पर्यायी वन पर्यटन रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर अडेगाव हे गेट जंगल पर्यटनासाठी २७ डिसेंबरपासून पर्यटकांकरिता खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना अडेगाव गेट मधूनही लुटता येणार आहे.
‘काय झाडी काय डोंगर’चा येतोय अनुभव
बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. या प्रकल्पातील पट्टेदार वाघाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेटी देऊन जंगल सफारीचा आनंद लुटतात. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना ‘काय झाडी काय डोंगर वाघाची ती डरकाळी’चा अनुभव प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0