तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
postmans house नागरिकांच्या विश्वासावर उभे असलेले, वर्षानुवर्षे अविरतपणे विश्वासपूर्ण सेवा देणारे टपाल खाते पांढरकवडा शहरात विश्वासघाताचे केंद्र बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका पोस्टमनच्या घरी टपालाने भरलेले तब्बल तीन पोते सापडल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. ही टपाल नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लपवली गेली, की हा प्रकार वरिष्ठांच्या आशीर्वादानेच सुरू होता, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
या टपालात न्यायालयीन नोटिसा, आधारकार्ड, एलआयसी पॉलिसी, बँक एटीएम-क्रेडिट कार्ड, पेन्शन कागदपत्रे आणि महत्त्वाची शासकीय पत्रे असल्याचे उघड झाले आहे. ही कागदपत्रे वेळेवर न पोहोचल्यामुळे शेकडो नागरिकांचे आर्थिक, कायदेशीर आणि सामाजिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा छडा स्थानिक वकील अॅड. गाजी इबादुल्ला खान यांनी लावला. मागील एक वर्षापासून नागरिकांना टपाल मिळत नसल्याच्या सततच्या तक्रारीनंतर 22 डिसेंबर रोजी पोस्टमन सतीश धुर्वे यांच्या घरी चौकशी करण्यात आली. तेथे टपालाने भरलेली तीन मोठी पोती आढळून आली आणि टपाल खात्यातील गैरकारभाराचा विस्फोट झाला.
या गंभीर प्रकरणावर प्रभारी पोस्टमास्तर अमोल पाटोळे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप असून, यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय अधिकच गडद झाला. दोषी केवळ पोस्टमनच की यामागे मोठे जाळे आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. टपाल न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना न्यायालयीन अडचणी, आर्थिक तोटे व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. टपाल खातं सेवा देतंय की फसवणूक, असा थेट सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.postmans house या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी पोस्टमनसह जबाबदार अधिकाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा पांढरकवड्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे.