नवी दिल्ली,
Vijay Hazare Trophy : २४ डिसेंबर रोजी, विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये, बिहारने स्पर्धेच्या इतिहासात धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय मिळवला, तर कर्नाटकने आता धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. झारखंड आणि कर्नाटक यांच्यातील गट अ सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. झारखंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार इशान किशनच्या १२५ धावांच्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ४१२ धावा केल्या. त्यानंतर कर्नाटकने ५ गडी गमावून ४७.३ षटकांत हे लक्ष्य गाठले. कर्नाटककडून देवदत्त पडिक्कलने फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावत १४७ धावा केल्या.

कर्नाटकने झारखंडविरुद्धच्या विजयासह विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही केला. कर्नाटकने १३ वर्षे जुना आंध्रचा विक्रम मोडला. आंध्रने यापूर्वी २०१२ मध्ये गोवा विरुद्ध ३८४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता आणि ४८.४ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले होते. पडिकल व्यतिरिक्त, झारखंड विरुद्धच्या या सामन्यात कर्नाटककडून अभिनव मनोहर आणि ध्रुव प्रभाकर यांनीही फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. अभिनवने ५६ धावा केल्या, तर ध्रुव ४० धावा काढल्या.
कर्नाटकचा विजय हा लिस्ट ए क्रिकेट इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. या बाबतीत पहिला क्रमांक दक्षिण आफ्रिकेचा आहे, ज्याने २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४३५ धावांचे लक्ष्य गाठले होते. कर्नाटक आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी, हे स्थान क्वीन्सलँडकडे होते, ज्याने २०१४ मध्ये तस्मानियाविरुद्ध ३९९ धावांचे लक्ष्य गाठले होते.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक यशस्वी धावांचे पाठलाग
दक्षिण आफ्रिका - ४३५ धावा (वि. ऑस्ट्रेलिया, २००६)
कर्नाटक - ४१३ धावा (वि. झारखंड, २०२५)
क्वीन्सलँड - ३९९ धावा (वि. तस्मानिया, २०१४)
कराची प्रदेश - ३९२ धावा (वि. सियालकोट, २००४)
मिडलसेक्स - ३८८ धावा (वि. डरहम, २०२५)
आंध्र - ३८४ धावा (वि. गोवा, २०१२)