आरसबीच्या वेगवान गोलंदाजाला अटक होणार!

25 Dec 2025 11:22:38
नवी दिल्ली,
yas dayal arrest warrant भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा खेळाडू यश दयालला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जयपूरच्या पॉक्सो न्यायालयाने २४ डिसेंबर २०२५ रोजी त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी यश दयालविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयपूर महानगर प्रथम येथील पॉक्सो कोर्ट क्रमांक-३ च्या न्यायमूर्ती अलका बन्सल यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवले असल्याचे दिसून येत नाही.
 

yash dayal 
 
तपासात आरोपीची भूमिका समोर आली असून त्याची सखोल चौकशी अजून बाकी आहे. तरीही यश दयालसाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला आहे. सध्या तो या प्रकरणामुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तक्रारदार तरुणीने २३ जुलै २०२५ रोजी जयपूरच्या सांगानेर पोलीस ठाण्यात यश दयालविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तिने सांगितले की, २०२३ मध्ये तिची यश दयालशी ओळख झाली, तेव्हा ती १७ वर्षांची अल्पवयीन होती. पीडितेच्या आरोपानुसार, लग्नाचे आमिष दाखवून यशने तिचे भावनिक आणि शारीरिक शोषण केले. पहिली घटना २०२३ मध्ये जयपूरमधील सितापुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली, आणि हा प्रकार जवळपास दोन वर्षे सुरू होता.
 
सुनावणीदरम्यान यश दयालच्या वकिलांनी आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला. बचाव पक्षाने म्हटले की, दोघांमधील संबंध परस्पर संमतीने होते. तसेच, यश दयाल तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. या गंभीर प्रकरणात अडकल्यानंतरही आरसीबी संघाने यश दयालवर विश्वास दाखवला आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याला ५ कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले होते. मागील हंगामात त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर आयपीएल २०२६ साठीही आरसीबीने त्याला रिटेन केले आहे.
Powered By Sangraha 9.0