भ्रमणध्वनी चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना अटक

26 Dec 2025 18:25:20
वरोडा,
Varoda mobile phone theft वरोडा शहरात आठ दिवसांपूर्वी झालेल्या भ्रमणध्वनी चोरी प्रकरणात वरोडा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून, त्यांच्याकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 

Varoda mobile phone theft 
वरोडा शहरातील भर बाजारात असलेले एस. एस. मोबाईल हे दुकान 17 डिसेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास फोडले. या दुकानातून जवळपास 10 लाख 71 हजार रुपयांचे भ्रमणध्वनी चोरीस गेले होते. या घटनेची तक्रार एस. एस. मोबाईलचे संचालक अमित प्रकाश नाहर यांनी वरोडा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी या घटनेची त्वरेने दखल घेत परिसरातील दुकाने व घरांची जवळपास 100 सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे आढळून आले. या अल्पवयीन मुलांपैकी एक मुलगा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या ठिकाणावर जाऊन शोध घेतला असता त्याच्याजवळून गुन्ह्यातील 17 भ्रमणध्वनी ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता चोरीच्या घटनेत वरोडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या बालकासही ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गुन्ह्यातील एक भ्रमणध्वनी व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांकडून जवळपास 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बागल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शरद भस्मे, दिलीप सुर, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे, सौरव कुलथे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0