अमरावती,
amravati-mahayuti-seat-sharing : येथील महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिंदे सेना व युवा स्वाभिमान पार्टी या महायुतीची जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. शनिवारी सांयकाळी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुका युतीतच लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक नेत्यांना युती करण्याचे निर्देश असून चर्चेतून जागावाटपाला अंतिम स्वरूप दिल्या जात आहे. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थान नाही. त्या ऐवजी युवा स्वाभिमान पार्टी राहणार आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे.
महायुतीच्या चर्चेत भाजपाकडून जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, आ. संजय कुटे, प्रवीण पोटे, जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले आहेत. शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड, अभिजीत अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जिल्हाध्यक्ष संतोष बद्रे यांच्यासह अन्य सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे भाजपाची शिवसेना व युवा स्वाभिमानसोबत वेगवेळी चर्चा होत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाच्या ८७ जागांपैकी ७६ जागांवरच महायुतीची वाटपाची चर्चा होत आहे. यातल्या १४ जागा शिवसेनेला व ६ जागा युवा स्वाभिमानला देण्याची भाजपाची तयारी आहे. उर्वरीत ५६ जागेवर भाजपा लढू शकतो. तसे पहिले तर भाजपासाठी ही संख्या फारच कमी आहे. कारण, भाजपाचे गेल्या निवडणुकीत ४५ नगरसेवक विजयी झाले होते. तेव्हा ७६ जागा भाजपाने लढविल्या होत्या. जागा वाटपाच्या अंतिम आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
८ नामांकन दाखल, ५६८ अर्जांची उचल
महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. ८ नामांकन अर्ज दाखल झाले. तर ५६८ अर्जांची उचल झाली. आतापर्यंत २३७८ अर्ज इच्छुकांनी घेतले आहे. अर्ज दाखल करण्याची गती राजकीय पक्षांकडून उमेदवार्या जाहीर झाल्यानंतरच वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दाखल अर्जाच्या संख्ये वाढ होईल. रविवारी सुटी आहे. त्यानंतर सोमवार व मंगळवार हे दोनच दिवस अर्ज दाखल करण्याचे आहे.