धारणी,
murder-of-a-young-man : पत्नीसोबत अनैतिक संबंधांची माहिती पतीला मिळाल्यानंतरच चिंटूची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धारणी जवळच्या उतावलीच्या एका शेतात २४ डिसेंबर रोजी धारणी येथील युवक चिंटू उर्फ जुबैर मो. जहुरचा मृतदेह विहिरीत दिसलेला होता. जात्याच्या दोन दगडांनी बांधून त्याला विहिरीत टाकण्यात आले होते. तेव्हाच चिंटूची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी माधवराव गरूड व पो. नि. अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सतिश झाल्टे व चौकशी पथकाने प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यातून त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर बुडा गंगाराम जांबेकर (५५, रा. कुसूमकोट) याला ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली. तपासा दरम्यान घटनेत पत्नीचा सहभाग लक्षात आल्यानंतर तिलापण अटक करण्यात आली. १८ डिसेंबरपासूनच चिंटू घरात नव्हता. एका शक्यतेनुसार तीन-चार दिवसांपूर्वीच त्याची हत्या केली असावी. साक्ष मिटविण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याची शक्यता आहे. या हत्याकांडात आणखी आरोपी आहे किंवा नाही याची माहिती पोलिस घेत आहे. अनैतिक संबंधांविषयी मेळघाटात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. आरोपींना तात्काळ पकडण्यात आल्याने संभाव्य तणाव निवळलेला आहे.