देव, दवा, हवा आणि पाणी!

26 Dec 2025 06:00:00
वेध
रेवती जोशी-अंधारे
9850339240
aravalli mountain range ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि तेही मानवनिर्मित! पण, आपल्याला निसर्गाने त्याहीपेक्षा चांगली सुरक्षा भिंत जवळपास तीन अब्ज वर्षांपूर्वीच दिली. अरावली पर्वतरांग गुजरातमधील माऊंट अबूपासून सुरू होऊन राजस्थान, हरयाणा आणि दिल्लीपर्यंत म्हणजे उत्तरेपासून पूर्वेपर्यंत सुमारे 690 किमी पसरलेली आहे. अरावलीतील गुरू शिखर हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची सुमारे 1722 मीटर आहे. ही जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक आहे. हडप्पा संस्कृतीच्या काही वसाहती अरावलीच्या आसपास आढळतात. चित्तोडगड, कुंभलगड हे किल्ले अरावलीतच वसलेत. लूनी, बनास आणि साबरमती नद्यांचे उगमस्थान अरावलीने थारचा विस्तार वर्षानुवर्षे रोखून धरला आहे. अरावली म्हणजे पृथ्वीच्या इतिहासाचे जिवंत अवशेष, काळाच्या साक्षीने उभी असलेली भारताची सर्वात प्राचीन नैसर्गिक भिंत! भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने अरावली ही प्रिकॅम्ब्रियन काळातील निर्मिती असून तिचे आजचे कमी उंचीचे स्वरूप म्हणजे कोट्यवधी वर्षांच्या नैसर्गिक क्षयाचे परिणाम आहेत. ही झीज नैसर्गिक होती; मात्र सध्याची झीज मानवनिर्मित आहे आणि ती अधिक चिंताजनक आहे.
 
 

aravli maountain 
 
 
या पर्वतरांगेने उत्तर भारताला भौगोलिक ओळख तर दिलीच; सोबत हवामान संतुलनाचे कामही केले. थार वाळवंटाचा विस्तार रोखणे, पावसाच्या ढगांची दिशा बदलणे आणि अनेक नद्यांना जन्म देणे ही सर्व कामे अरावली शांतपणे करत आली. शत्रूंपासून संरक्षण करणारी ही पर्वतरांग आज मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी आक्रोश करतेय आणि म्हणूनच या मूकनायकाविषयी बोलण्याची वेळ आली आहे. अरावलीचे आध्यात्मिक महत्त्वही आहे. आदिवासी बांधवांसाठी हे पर्वत ‘भाखर देवता’ आणि ‘आबू राज’ म्हणून पूजनीय आहेत. अरावलीचा विनाश त्यांच्या दैवताचा अपमान आहे. अरावलीच्या लहान-मोठ्या गुहांमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती असून त्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा मुख्य आधार आहेत. अरावली शुद्ध प्राणवायू, औषधी, पाणी आणि आध्यात्मिक साधनेच्या संधी देणारी अरावली एक परिपूर्ण नैसर्गिक रुग्णालय आहे. नैसर्गिक अनियंत्रित खणन, कल्पनेपलिकडचं शहरीकरण आणि अफाट जंगलतोड, अरावलीच्या मुळावर उठले आहेत. ‘ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा नसतो’ ही पूर्वजांची शिकवण साफ विसरून आपण अरावलीला कुरतडत आलोय. काही स्क्वेअर फुटांचा हिशोब मांडणाèया यच्चयावत मानवजातीला अरावलीचा अतिविशाल व्याप, त्यातील नैसर्गिक परिसंस्था आणि त्याचा विनाश समजून घेण्याचा आवाकाच उरलेला नाही. नैसर्गिक अधिवास वेगाने कमी झाल्यामुळे वन्यजीव-मानव संघर्ष वाढतोय. राजधानीत दररोज प्रदूषणाचे नवे विक्रम तयार होत असताना अचानक पूर, दुष्काळ, कडाक्याची थंडी, धुकं किंवा जीवघेणा उकाडा अशा बदलत्या ऋतुचक्राकडे बघायलाही आम्हाला वेळ नाही. उकडतंय मग लावा एसी, हवा प्रदूषित झाली तर लावा प्युरिफायर, थंडी वाढली लावा हिटर... सुखाच्या अतर्क्य कल्पनांसोबत मानव निसर्गाच्या जिवावर उठला आहे. अरावलीचा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही तर पुढील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कायदे आहेत, न्यायालयांचे आदेश आहेत मात्र, अंमलबजावणीचा अभाव स्पष्टपणे दिसतो. संवर्धनाचे कागदी वाघ नाचवणे आम्ही कधी बंद करणार आहोत? आधीच खूप उशीर झालाय.aravalli mountain range आता निर्णय प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. अरावलीची झुंज निसर्गाशी नाही तर माणसाच्या अमर्याद लोभाशी आहे. काळ, वारा, पाऊस यांना समर्थपणे तोंड देणारी अरावली आज बुलडोझर, स्फोटके आणि प्रशासकीय निष्क्रियतेपुढे हतबल आहे. अरावली ही केवळ पर्वतरांग नाही; ती उत्तर भारताची हिरवी ढाल आहे. या विशाल पर्वतांच्या ‘टेकड्या’ होणं, हे अपयश केवळ प्रशासनाचे नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचे नैतिक अपयश आहे. प्रश्न इतकाच की, आपण प्रगती करतोय की, पायाखालची जमीनच उखडतोय? कालच्या निर्णयांवर आज कृती केली नाही तर, उद्या उरणारच नाही. निसर्गाशी संघर्ष करून माणूस कधीच जिंकलेला नाही आणि यावेळीही तो जिंकणार नाहीच. अरावली ही भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्याचा इशारा आहे. अन्यथा इतिहासात अरावलीचा उल्लेख ‘होती एक पर्वतरांग’ असा होण्यास फारसा काळ लागणार नाही. अरावली वाचवणे म्हणजे भूतकाळ जपणे नव्हे, तर भविष्य सुरक्षित करणे होय.
........
Powered By Sangraha 9.0