तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
legal-awareness-camp : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 23 डिसेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात कौटुंबिक कायदे, विवाह, वारसा हक्क, दत्तकविधान, पोटगी, मध्यस्थीचे महत्व, हुंडा, जातीय भेदभाव व स्त्री भ्रूणहत्या या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दीपक दाभाडे होते. प्रमुख उपस्थितात प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पॅनल वकील विजया घाडगे उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना विजया घाडगे यांनी हिंदू विवाह कायदा 1955, हिंदू उत्तराधिकार कायदा 1956, वैध-अवैध विवाह, वारस प्रमाणपत्र व दत्तकविधान याबाबत सविस्तर माहिती दिली. मृत व्यक्तीच्या मालमत्तेवरील कायदेशीर वारसा हक्क कसा सिद्ध करता येतो याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.
दीपक दाभाडे यांनी शिक्षण व कायद्याच्या ज्ञानाचे महत्व विषद करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कायद्याची माहिती आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नारायण वाघमारे, तर आभारप्रदर्शन गाडे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.