बुलढाणा,
Lokakavi Vamandada Kardak राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन शनिवारपासून सुरू होत आहे. या साहित्य संमेलनात तब्बल १४ सत्रांमधून सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रबोधनात्मक विचारांची उधळण होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, गर्दे वाचनालयाच्या सभागृहात दि. २७ व २८ डिसेंबर दोन दिवसीय लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे उदघाटन माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाध्यक्ष आहेत. तर स्वागताध्यक्ष् क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे राहणार आहेत. उदघाटन सत्रात आमदार सिध्दार्थ खरात, संजय गायकवाड, साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. आशुतोष पाटील, डॉ. प्रकाश होळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर जिपचे मुकाअ गुलाबराव खरात, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, प्राचार्य गोविंद गायकी, डॉ. सुकेश झंवर, अमोल हिरोळे, दिलीप जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
संविधान सन्मान रॅली, ग्रंथ प्रदर्शनी, तसेच मराठी भाषा संवर्धन, वाचन चळवळ व युवक आणि भारतीय संविधानाची ७५ वर्षे व वर्तमान समाज, अभिजात मराठी भाषा व वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील जीवनमूल्ये या तीन महत्वाच्या विषयावरील परिसंवाद अनुक्रमे विठ्ठल कांगणे, अॅड. असिम सरोदे व प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेत होणार आहेत. भोपाळ येथील सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध साहित्यिक कैलास वानखेडे व भाषा, लिपीतज्ज्ञ, संशोधक व नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांची मुलाखत, शाहीर निवृत्ती तायडे व शाहीर डी. आर. इंगळे यांचा आंबेडकरी जलसा, कवी अनंत राऊत यांचा कविता परीवर्तनाच्या कार्यक्रम होणार आहे