अग्रलेख....
manse shivsena yuti कविमनाच्या माणसांकडे द्रष्टेपण असते असे म्हणतात. म्हणूनच त्यांच्या मनात उमलणाऱ्या कविकल्पना यादेखील दृष्टान्तासारख्याच असाव्यात. कवीच्या द्रष्ट्या कल्पनांना मान्यता मिळते हे खरे असले, तरी वास्तवालाही कधी कधी अपवादाचा छेद मिळतो, हेही तितकेच खरे. किंबहुना अपवादामुळेच वास्तवाचे सिद्धान्त सिद्ध होतात, असेही म्हटले जाते. ‘दोन ओंडक्यांची होते, सागरात भेट, एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ’ या ‘गदिमां’नी गीत रामायणात उद्धृत केलेल्या दृष्टान्तालाही अपवाद ठरावा, अशा दुर्मिळ गोष्टी कधी कधी घडतात. समुद्रात भरकटत वाहणारे ओंडके एखाद्या क्षणी जवळ येतात, पण एखाद्या लाटेच्या तडाख्याने ते एकमेकांपासून दूर जातात आणि पुन्हा जवळ येत नाहीत, हे वास्तव आहेच.
पण विशेषतः राजकारणासारख्या क्षेत्रात एखादा दृष्टान्त, सिद्धान्त किंवा नियम कधीच तंतोतंत खरा ठरत नसतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या गडास गेल्या सुमारे सहा दशकांच्या वाटचालीत अनेक भगदाडे पडली. अनेक बिनीच्या मोहऱ्यांनी पक्षास जय महाराष्ट्र करून आपापल्या वेगळ्या वाटा धरल्या, पण त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयीच्या ममत्वाचा हळवा कोपरा कायम जिवंत राहिला. पुढे ठाकरे घराण्यातच नेतृत्वाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादातून खुद्द राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली तेव्हा मात्र पक्षाची खऱ्या अर्थाने शकले झाली. या वादाच्या वादळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे वेगळे होणे म्हणजे, सागरात भेटलेल्या दोन ओंडक्यांना लाटेच्या तडाख्याने दूर सारण्यासारखेच ठरले असले, तरी आता दोन दशकांनंतर त्यांनीच या कविकल्पनेस अपवाद असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. एखाद्या लाटेच्या तडाख्याने वेगळे झालेले दोन ओंडके अलिकडे सातत्याने सुरू असलेल्या पराजयाच्या लाटेमुळेच अस्तित्वाच्या चिंतेपायी एकत्रही येऊ शकतात, हे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या युतीमुळे सिद्ध झाले असून वास्तवाच्या सिद्धान्तास त्यामुळे छेद मिळाला आहे.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास ठाम नकार देऊन राज ठाकरे यांनी 20 वर्षांपूर्वी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक लाट ‘जोडी’ दोघां.. नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. ‘ज्याला दीड दमडीचेही राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी आपण शिवसेनेचे नेतेपद सोडत आहोत’ असे सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेला पहिले भगदाड पाडले, त्याला दोन दशके पूर्ण झाल्यानंतर एका नव्या लाटेमुळे पुन्हा त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत जाणे भाग पडले आहे. भाजपाप्रणीत महायुतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडी नावाची गाजराची पुंगी पुरती मोडून टाकली आणि या आघाडीतील अन्य पक्षाप्रमाणेच ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी पराभवाच्या लाटेचा फटका बसला. अगोदरच फुटीमुळे जर्जर झालेल्या ठाकरे यांच्या सेनेसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न शिल्लक आहे, हे त्यांच्या पक्षाने निवडणुकीत गमावलेल्या जनाधारावरूनच स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे अन्य पर्याय जोडण्याचे सारे मार्ग संपल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणूनच ठाकरे गट आणि राज ठाकरेंचा पक्ष यांच्या युतीकडे पाहावे लागेल.
‘जे शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पापाचा भागीदार होण्याची आपली इच्छा नाही’ हे राज ठाकरे यांचे 20 वर्षांपूर्वीचे विधान होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस सातत्याने पराभवाच्या लाटा झेलाव्या लागत असून पक्षास लागलेली गळती व गमावत चाललेला जनाधार यांमुळे ही शिवसेना संपण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे आणि या स्थितीच्या पापाचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडले जात आहे, हेही स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांनी त्या वेळी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करताना, या पापात सहभाग नको, अशी भावना व्यक्त केली होती. आता शिवसेना संपविण्याच्या पापात आपला सहभाग नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आले आहेत. ज्यांना दीड दमडीचेही राजकारण कळत नाही त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नाही, असे त्यांनी पक्षत्यागाच्या वेळी सांगितले, तेव्हा त्या वक्तव्याचा रोख थेट उद्धव ठाकरे यांच्याकडेच होता. गेल्या 20 वर्षांत शिवसेनेच्या राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या निष्ठावंतांना मोठ्या अपेक्षा होत्या. राज ठाकरे यांच्या तुलनेत तेव्हा फारच तोकडा अनुभव असलेले उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवून पक्ष पुढे नेऊ शकतील, याविषयी शंका असलेले अनेक निष्ठावंत राज ठाकरे यांच्याकडे अपेक्षेने पाहात होते, पण त्यांचा अपेक्षाभंग झालाच, पण उद्धव ठाकरे यांच्याविषयीदेखील भ्रमनिरास झाला. ज्यांना दीड दमडीचाही अनुभव नाही असे राज ठाकरे म्हणत होते, त्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या राजकारणास बगल देत महाविकास आघाडीचा झेंडा हाती घेऊन राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या राज ठाकरे यांचा पक्ष मात्र, सत्तेच्या गणितात सातत्याने कच्चा राहिला. या पक्षाला राजकारणातही फारसे स्थान उरले नाही. राजकारणातला अनुभव आणि डावपेचांचा नेमका वापर या दोन वेगळ्या बाबी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेच, पण आपले राजकारण बाळासाहेबांच्या राजकारणाहूनही दोन पावले पुढचे आहे, याचीही चुणूक त्यांनी दाखविली. बाळासाहेब भोळे होते, मी भोळा नाही तर धूर्त आहे, असे जाहीरपणे सांगणाऱ्या ठाकरेंनी त्याच धूर्तपणाचा वापर करून भाजपासोबतच्या युतीला दगा देऊन शरद पवारांचे बोट धरत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पद हस्तगत केले, तेव्हाच कदाचित राज ठाकरे यांना आपल्या 20 वर्षांपूर्वीच्या त्या वक्तव्याचा पश्चात्तापही झाला असावा. तेव्हा राजकारणात दीड दमडीचाही अनुभव नसल्याची भावना व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंनी नंतरच्या दोन दशकांत उद्धव ठाकरेंच्या राजकारणातील कोलांटउड्यांसकट सारे अनुभव पाहिले आणि भाजपाच्या देशव्यापी लाटेच्या तीव्र तडाख्यामुळे ठाकरेंच्या जर्जर झालेल्या शिवसेनेसोबत पुन्हा जाण्याची वेळ राज ठाकरे यांच्यावर आली. नाराजीच्या लाटेमुळे वेगळे झालेले हे दोन भाऊ भाजपा लाटेच्या तडाख्याने एकत्र आले आणि लाटेच्या तडाख्यात वेगळे झालेले ओंडके पुन्हा भेटत नाहीत या कविकल्पनेस त्यांच्या राजकारणाने छेद दिला.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या दोन दशकांत महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवू शकली नाहीच; उलट या पक्षाचे अस्तित्व वर्षागणीक अधिकाधिक क्षीणच होत गेले. नेतृत्वाचा एकखांबी तंबू असलेल्या कोणत्याही पक्षाची हीच अवस्था होत असते. त्यातही घराण्याच्या पुण्याईची शिदोरी घेऊन राजकारण करणाऱ्यांना ती पुण्याई असेपर्यंतच स्थान टिकविणे शक्य होत असते. ती उतरणीस लागली की, त्यांचे राजकारणही उतरणीस लागते. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी बाळासाहेबांची पुण्याई होती आणि राज ठाकरेंच्या राजकारणाही बाळासाहेबांच्या पठडीचे संस्कार होते. ही पुण्याई व संस्काराचा वारसा टिकविण्यात हे दोघेही नेते पुरेसे यशस्वी ठरले नाहीत, त्यामुळे बाळासाहेबांच्या राजकारणाचा प्रभावाने भारावलेला मतदारही या दोहोंपासून दुरावत गेला. बाळासाहेबांनी कधीच मान्य केल्या नसत्या अशा अनेक तडजोडी उद्धव ठाकरे यांना अस्तित्व टिकविण्याच्या धडपडीत कराव्या लागल्या आणि त्यामध्ये त्यांच्या पक्षाची प्रतिमादेखील पणास लागली. आता राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस महाराष्ट्राच्या राजकारणातून पुरती गळती लागल्याचे स्पष्ट झाल्याने, अस्तित्वाच्या लढाईचा अखेरचा मार्ग म्हणून या दोघांना अपरिहार्य परिस्थितीने एकत्र आणले आहे आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईला मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईचा मुलामा देऊन जुन्याच भावनिक मुद्यानिशी आपले उरलेसुरले अस्तित्व जपण्याची धडपड सुरू केली आहे. राज आणि उद्धव यांचे मनोमीलन हा प्रीतिसंगम आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना, हा प्रीतिसंगम नसून भीतीसंगम आहे, अशी थेट खिल्ली भाजपाने उडविली होती.manse shivsena yuti मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भीती दाखविण्याचा गुळगुळीत झालेला मुद्दा हेच या उभयतांच्या राजकारणाचे भावी भांडवल असणार हे सिद्ध झाले आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेवर सत्ता होती, तेव्हा मराठी माणसाचे मुंबईतून नामशेष होणारे अस्तित्व जपण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने काय केले असा सवाल मराठी माणूस आता त्यांना विचारणारच आहे. त्याचे उत्तर देऊन मगच उद्धव आणि राज यांना आपल्या मनोमीलनाच्या हेतूमागील पारदर्शकता सिद्ध करावी लागेल. अन्यथा, आपले राजकारणातून संपत चाललेले अस्तित्व टिकविण्याच्या धडपडीपायी अपरिहार्यतेने एकत्र आलेले कुटुंब एवढाच त्यांच्या युतीचा निष्कर्ष असेल. राज आणि उद्धव यांनाही त्याची जाणीव नसेल असे नाही, पण अन्य कोणताच मार्ग शिल्लक नसेल, तर भाजप लाटेच्या तडाख्यामुळे एकत्र येणाऱ्या या दोघांना आता एकमेकांसोबत राहणे हाच पर्याय शिल्लक राहिलेला असेल.