नांदगाव पेठ,
suicide-case : येथील रहिवासी व सध्या रहाटगाव येथे वास्तव्यास असलेले शशिकांत विनायकराव महल्ले (४६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

शशिकांत महल्ले हे अमरावती येथील शिक्षक बँकेत कार्यरत होते. मात्र, नोकरीदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हेही दाखल होते. या सर्व प्रकरणांमुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी ते अचानक घरातून बाहेर पडले. त्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी दुपारी रहाटगाव येथील वृंदावन सदनिका परिसरामागील, आरोग्य कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळच असलेल्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा सखोल तपास नांदगाव पेठ पोलिस करीत आहेत.