पवनी,
dr vijaya nandurkar अत्यंत चूरशीच्या ठरलेल्या पवनी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉ. विजया नंदुरकर यांनी विजयश्री खेचून आणला. जनतेने टाकलेला हा त्यांच्यावरील विश्वास होता. कदाचित डॉक्टर असल्याने शहराच्या आजरपणाच्या नाड्या ओळखून काम होईल, अशी आशा पवनीकरांना असावी. याच विश्वासाला जागत नगराध्यक्षा कामाला लागल्या असून भल्या सकाळीच त्यांनी क्रीडा संकुलाला भेट देत तेथील अडचणी समजून घेतल्या.
जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. यात पवनी नगर परिषदेची निवडणूकही तेवढीच अटीतटीची आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणारी ठरली. भाजपच्यात असलेल्या मात्र ऐनवेळी तिकीट नाकारल्याने अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवीत निवडणूक लढविलेल्या डॉ. विजया नंदुरकर यांनी बाजी मारली. व्यवसायाने डॉक्टर असल्याने कायमच सामान्यातील सामान्य लोकांशी असलेला जनसंपर्क, मृदुभाषी स्वभाव अशा गोष्टींमुळे त्यांचे पारडे जड वाटत होते. समोर असलेल्या भाजपच्या उमेदवार भावना भाजीपाले याही तोडीस तोड अशाच होत्या. त्यांच्यामागे पक्षाची भक्कम ताकद होती. मात्र तुलनेत समाजाभिमुख अधिक असलेल्या डॉक्टर उमेदवाराला नगराध्यक्ष म्हणून पवनीकरांनी निवडले.
आता निवडणुका संपल्या. निवडून आलेल्या नगराध्यक्षासाठी नगरातील प्रत्येक व्यक्ती त्याची जबाबदारी आहे. त्याच्या अडीअडचणी, समस्या आणि सोयी सुविधांची तजवीज पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करणे त्याची जबाबदारी आहे. एक डॉक्टर व्यक्ती आजारी माणसाची नाडी तपासून त्याचा आजार ओळखू शकते. कदाचित हाच विश्वास पवनीकरांना असावा. म्हणूनच तर एका डॉक्टरांच्या हाती पवनी नगराची धुरा देत, शहाराला आजारमुक्त करण्याची जबाबदारी लोकांनी त्यांच्यावर सोपविली आहे. पवनीकरांनी टाकलेला हा विश्वास जपण्याची जबाबदारी नव्या नगराध्यक्षांची आहे. प्राचीन असलेल्या पवनी शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासोबत शहराचे सौंदर्य जपताना स्वच्छता विषय महत्वाचा ठरणार आहे. आरोग्याच्या सोयी, स्वच्छ पाणी पुरवठा, पाथदिवे, चांगले रस्ते, क्रिडांगण, बगीचे या गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागणार आहेत. पालिकेच्या कामात नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कामात सहजता येण्याच्या दृष्टीने व्यवस्था उभारण्याची गरज आहे.
लोकांनी टाकलेल्या या विश्वासाला जागतच कदाचित नगराध्यक्ष डॉक्टरांनी काम सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सकाळीच शहरातील क्रीडा संकुलाला भेट देत तेथील येणारे खेळाडू, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुला मुलींची संवाद साधला. त्याच्या अडचणी जाणून घेतल्या.dr vijaya nandurkar तालुका क्रीडांगण असूनही तेथे रनिंग ट्रॅक नाही. पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही अशा समस्या पुढे आल्या. सराव करण्यासाठी खेळाडूंनाच मैदान सपाट करण्याची वेळ आली. एकीकडे क्रीडा क्षेत्र महत्वाचे म्हणून खेळ आणि खेळाडू यांच्या विकासासाठी केंद्र प्रचंड पुढाकार घेत असताना पवनीच्या क्रीडा संकुलाची व्यवस्था दुर्दैवी होती. म्हणूनच यात लक्ष घालून संकुल उत्तम करण्याचा निर्धार नगराध्यक्षानी बोलून दाखविला.