पुणे,
cold wave गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह महाराष्ट्रभर जाणवत असलेली थंडी अजून काही दिवस टिकण्याची चिन्हे आहेत. हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नव्या वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे, तर यंदाच्या हंगामात आल्हाददायी गारवा दीर्घकाळ अनुभवता येण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणारे थंड वारे, निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे शहरातील हवेतील गारवा वाढला आहे. गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. २१ डिसेंबर रोजी रविवारी हवेली येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्या पूर्वीही किमान तापमान ७ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होते. गुरुवारी शहरातील किमान तापमान ९.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार वर्षअखेरीपर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये रात्रीचे किमान तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. तथापि, उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे नव्या वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिवसाचे तापमान देखील कमी होत राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या नोंदींनुसार, cold wave गेल्या दहा वर्षांतील डिसेंबर महिन्यातील नीचांकी तापमानाचा आढावा घेतल्यास, २०१८ मध्ये ५.९ अंश सेल्सियस, २०१५ मध्ये ६.६ अंश सेल्सियस, तर गेल्या वर्षी ८.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते.विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात थोडीशी वाढ झाली आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला येथे ११.५, अमरावती १२.४, बुलढाणा १३, ब्रह्मपुरी १२.५, चंद्रपूर १२.४, गोंदिया १०.५, नागपूर ११.२, वाशिम ११.४, वर्धा १०.९, यवतमाळ १० अंश सेल्सियस, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर १०.६, परभणी ११.२, अहिल्यानगर ८.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.हवामानतज्ज्ञांचे मत आहे की, थंडीच्या या हंगामात शहर आणि ग्रामीण भागांमध्ये रात्रीचे किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या आसपास राहील, तर दिवसाचे तापमानही तुलनेने कोरडे आणि थंड राहण्याची शक्यता आहे.