वाशीम,
Beti Bachao Beti Padhao समाजात मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे ही काळाची गरज आहे. बेटी बचाव बेटी पढाओ हा केवळ शासकीय उपक्रम नसून तो सामाजिक चळवळ म्हणून राबविला गेला पाहिजे. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करून स्त्री भृणहत्या रोखणे अत्यावश्यक आहे. यासाठी सोनोग्राफी केंद्रांवर नियमित व पारदर्शक तपासण्या कराव्यात आणि कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षण, आरोग्य व सक्षमीकरणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर सुधारण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत जिल्हा कृती दल व जिल्हा संनियंत्रण समितीची सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. आढावा सभेला जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे,विधी अधिकारी महेश महामुने, जिल्हा प्रकल्प सहयोगी निलिमा भोंगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराची सद्यस्थिती, मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी राबविण्यात येणार्या योजना, तसेच स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) ची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सोनोग्राफी व अल्ट्रासाऊंड केंद्रांची नियमित तपासणी, नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया, तपासणीदरम्यान आढळणार्या त्रुटी तसेच त्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. कायद्याचे उल्लंघन करणार्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. यावेळी बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणार्या जनजागृती कार्यक्रमांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण व शहरी भागात महिलांचे व पालकांचे समुपदेशन, शाळा महाविद्यालयांमधील जनजागृती उपक्रम, तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
शालेय व खाजगी शिकवणी परिसरात चिडीमारी होत असल्यास पोलिस विभागाने गांभीर्याने लक्ष ठेवावे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने योजनांचे पत्रक तयार करून ते वितरित करावे जेणेकरून गरजूंना लाभ मिळेल. बेटी बचाव बेटी पढाव या महत्त्वाकांक्षी अभियानात आयसीडीएस चा महत्त्वाचा रोल आहे. जिल्हा कृती दलाने तालुकास्तरीय कृती दलाच्या बैठका आयोजित करून सविस्तर अहवाल मागून घ्यावे. असेही जिल्हाधिकार्यांनी यावेळी निर्देश दिले.
बैठकीस आरोग्य विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कृती दल व संनियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते. माहितीचे सादरीकरण जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंदे यांनी केले. बैठकीला महिलांशी निगडित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.