कारंजेकरांचे प्रेम कधीही विसरणार नाही : तहसीलदार झाल्टे

27 Dec 2025 17:42:07
कारंजा लाड,
Kunal Jhalte मागील तीन वर्षाच्या प्रशासकीय सेवा कार्यात कारंजातील नागरिकांनी सहकार्यासोबतच मला खूप प्रेम दिले. त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरणार नाही तसेच भविष्यात संधी मिळाली तर पुन्हा कारंजात येऊ असे भावूक उद्गार तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी काढले.
 

Kunal Jhalte, Tehsildar farewell, 
कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांची नुकतीच अकोला येथे प्रशासकीय बदली झाली आहे. त्यानिमित्त तहसील कार्यालय व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने २६ डिसेंबर रोजी स्थानिक हॉटेल नारायण इन येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर वाशीमचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख, वाशीमचे तहसीलदार निलेश पळसकर, मानोराचे तहसीलदार राजेंद्र पाटील, मंगरूळनाथचे नायब तहसीलदार रवी राठोड, डॉ. अजय कांत, शेखर बंग, पोलिस निरीक्षक प्रवीण शिंदे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, निवासी नायब तहसीलदार अनिल वाडेकर यांच्यासह तहसीलदार झाल्टे यांचे आई, वडील व पत्नी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती तहसीलदार झाल्टे पुढे बोलताना त्यांनी कारंजा येथे अधिकारी म्हणून प्रशासकीय काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी मैत्री झाली आणि कालांतराने ते परिवाराचा एक भाग झाले. सोबतच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पाठबळामुळे आपण चांगले काम करू शकलो, असे सांगताना त्यांनी आपल्या कारकीर्दीतील निवडणुकीसंदर्भातील आठवणी उजागर केल्या. कार्यक्रमात तहसीलदार झाल्टे व त्यांच्या परिवाराचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.प्रास्ताविक नायब तहसीलदार विनोद हरणे, सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी राहुल वरघट व शिक्षक गणेश राऊत तर आभार प्रदर्शन डॉ. राम गुंजाटे यांनी केले. कार्यक्रमाला कारंजा तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Powered By Sangraha 9.0