हिंगणघाट,
ai-tiger-photo-hinganghat : परिसरात वाघाचा मुत संचार असल्याच्या अफवांमुळे हिंगणघाट परिसरात दहशत पसरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) बनविण्यात आलेले खोटे फोटो समाज माध्यमांवर अनेकदा प्रसारित करण्यात आल्याने शहरात वाघाच्या अफवांची दहशत पसरली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून हिंगणघाट परिसरात वाघ असल्याची माहिती समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे. रस्त्याच्या मधोमध वाघ उभा असल्याच्या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पृष्ठभूमीवर वन विभागाने प्रत्येक ठिकाणी घटनास्थळी भेट देत परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली. परंतु, काहीही निष्पन्न झाले नाही. हिंगणघाट नजिकच्या पिंपळगाव नाल्यावर, शहरातील संत तुकडोजी वार्ड तसेच रिठे कॉलनीत वाघ दिसल्याचे बरेचसे फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे बनवून मागील दोन-तीन दिवसात समाज माध्यमांवर टाकले गेले. त्यामुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. आज शनिवार २७ रोजी सकाळी संत तुकडोजी वार्ड परिसरात पुन्हा वाघ असल्याची अफवा पसरली. याची दखल घेत वन विभाग आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने वाघ पाहिल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ समाज माध्यमावर फिरत असलेल्या फोटोवर विश्वास ठेवून अफवा पसरवण्यात आल्याचे समोर आले.
हिंगणघाट परिसरात वाघ असल्याची निव्वळ अफवा : क्षेत्र सहाय्यक
हिंगणघाट शहर तसेच परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याची बाब समाज माध्यमाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. ती खोटी असून हिंगणघाट परिसरात वाघ असल्याची निव्वळ अफवा असल्याचे वनविभागाच्या क्षेत्र सहाय्यक एम. एम. रवाळे यांनी सांगितले. वाघ असल्याची माहिती मिळालेल्या प्रत्येक ठिकाणी वनविभाग व पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. परंतु, कुठेही वाघाचे अस्तित्व आढळून आले नाही किंवा कोणी प्रत्यक्षदर्शी आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.