अमरावती,
amravati-news : दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात शनिवारी मोठी हालचाल पहायला मिळाली. उबाठा शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना झालेली ही भेट अनेक राजकीय संकेत देणारी मानली जात आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये ‘जायंट किलर’ म्हणून ओळख असलेले डॉ. अनिल बोंडे हे रणनीतीकार म्हणून परिचित आहेत. त्यामुळे या भेटीमागे केवळ सौजन्य नसून, येणार्या निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर मोठी राजकीय खेळी आखली जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या भेटीमुळे उद्धव गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या भेटीबाबत अधिकृत प्रतिक्रिया मात्र दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नसते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.