देशासाठी सायकल वारी...

27 Dec 2025 19:01:29
भंडारा,
cycle-pilgrimage-for-the-country : सलग 212 दिवस...9 हजार किलोमीटरचा प्रवास आणि 13 राज्य पालथी घालून ऑपरेशन सिंदूर व नवसंकल्प विकसित भारत यात्रा असा संकल्प सोडून सायकलने पानिपत येथून निघालेला तरुण आज भंडाऱ्यात पोहोचला. विद्यार्थ्यांशी संवाद, लोकांच्या भेटीगाठी, ऑपरेशन सिंदूर चे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या नऊ संकल्पना रुजवीत सुरू झालेला हा प्रवास नक्कीच आदर्शवत असा आहे.
 
 
 
JLK
 
 
दिनेश शर्मा असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. हरियाणा राज्यातील पानिपत येथील हा 40 वर्षीय तरुण क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होता. देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न मनात होते. सैन्यात जाता आले नाही, क्रीडा क्षेत्रात देशासाठी पदक मिळविता आले नाही. मात्र मनातील जिद्द संपलेली नव्हती. हा देश जवळून अनुभवण्यासाठी आणि देशात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलता यावा म्हणून सायकलने ऑपरेशन सिंदूर व नव संकल्प विकसित भारत यात्रा पूर्ण करण्याचा निर्धार करून 25 मे 2025 रोजी यात्रेला प्रारंभ केला. हे करताना चारधाम यात्रा पूर्ण करण्याचेही उद्दिष्ट ठेवले गेले. प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव आले. भाषेला घेऊन येणाऱ्या अडचणी दक्षिण भारतात अनुभवल्या. काही चांगले अनुभवही वाटायला आले. वाटेत जिथे जिथे शक्य झाले तिथे शाळकरी विद्यार्थ्याशी, समाजातील सज्जनशक्ती सोबत संवाद साधून ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या नव संकल्पाचे विचार प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला असे, दीपक शर्मा सांगतात.
 
 
आतापर्यंत तीन धाम ची यात्रा पुर्ण करीत 13 राज्य पालथे घातले. 212 दिवसात 9 हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने केल्याचे ते सांगतात. पुढील मे महिन्यापर्यंत यात्रा अशीच चालू राहणार असल्याचे ते म्हणाले. अडचणी अनेक आल्या मात्र त्यावर मात करण्यासाठी अनेक हात पुढे आल्याचेही ते म्हणाले.
 
 
आज भंडारा येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेत काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी दीपक शर्मा यांचे स्वागत केले. यावेळी शिवानी धनकर, दिपक थोटे, नितीन बिरणवार, कोमल बघेले, महेंद्र निंबार्ते, विहीपचे संघटन मंत्री विशाल साळवे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक मनीष बिछवे, दिपक कुंभरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0