सहकारी बँकांमुळे प्रगतीला चालना

27 Dec 2025 19:58:14
अमरावती, 
devendra-fadnavis : ज्या भागात सहकारी आणि अन्य वित्तीय संस्था आहेत, त्याच भागात प्रगती होते. देशातील कोणत्याही प्रगत भागात पाहिले असता आपल्याला वित्तीय संस्था अधिक दिसतील. प्रगतीसाठी वित्त महत्त्वाचे आहे. बँक कोणतीही असो गरजूंना कर्ज मिळते. तो त्याच्या पायावर उभा राहू शकतो. पर्यायाने बँक नसत्या तर त्या व्यक्तीला सावकाराकडे जावे लागले असते. एकंदरीत बँकांमुळे सर्वसामान्य व्यक्ती सावकारी पाशापासून दूर राहू शकतो आणि प्रगतीला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 

CM 
 
 
 
शहरातील शेगाव नाका ते रहाटगाव मार्गावर महात्मा फुले अर्बन को-ऑ. बँकेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, उपाध्यक्ष प्रमोद कोरडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खा. बळवंत वानखडे, आमदार रवी राणा, आ. उमेश यावलकर, आ. प्रवीण तायडे, आ. प्रताप अडसड, आ. परिणय फुके यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २५ वर्षांपूर्वी आमचे नेते विनायकदादा कोरडे यांनी या बँकचे रोपटे लावले. वटवृक्षात रूपांतरीत झालेली ही बँक आज रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याचा आनंद आहे. बँकेच्या यशासाठी सर्व संचालक मंडळांनी मेहनत घेतली आहे. मी बँकेची बॅलन्स शीट पाहत होतो. त्यावर कुठेही बोट ठेवता येत नाही. इतके व्यवस्थित काम बँकेचे आहे. एनपीए १.७७ पर्यंत थांबवणे म्हणजेच बँकेचा कारभार अतिशय योग्य आहे, असे समजले जाते. बँकेला अजूनही बराच मोठा टप्पा गाठायचा आहे आणि ही बँक नक्कीच तो गाठणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. आभार उपाध्यक्ष प्रमोद कोरडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बँकेचे कर्मचारी, खातेधारक, हितचिंतक उपस्थित होते.
 
 
बँकेकडून पाच लाखांची मदत
 
 
महात्मा फुले अर्बन को-ऑ. बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लक्ष रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. त्याचा धनादेश बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना कार्यक्रमादरम्यान सुपूर्द केला.
Powered By Sangraha 9.0