गडचिरोली,
devendra-fadnavis : गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आधुनिक तंत्रकौशल्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक–खाजगी भागीदारीत अडपल्ली (गडचिरोली) येथे स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (University of Advanced Technology Institute -UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या संस्थेमुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगारक्षम बनवणे, उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि ‘लोकल टू ग्लोबल’ संकल्पनेला चालना देणे, हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गडचिरोलीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि कौशल्य विकास यांचा समन्वय आवश्यक असून UATI ही संस्था त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक व आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.