वर्धा,
dead-infant : जिल्हा सामान्य रुग्णालयात सलग दुसर्या गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी बालरोग विभागालगतच्या रेकॉर्ड कक्षाला लागलेल्या आगीची चर्चा थांबत नाही तोच, आज शनिवार २७ रोजी सकाळी रुग्णालयाच्या शौचालयात मृत नवजात अर्भक आढळून आले. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
शनिवारी सकाळी एएनसी ओपीडीजवळील शौचालयात साफसफाईसाठी गेलेल्या महिला कर्मचार्याला अर्भक दिसून आले. ही बाब लक्षात येताच तात्काळ वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली. काही वेळातच संपूर्ण रुग्णालयात ही बातमी पसरली आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वरिष्ठ अधिकार्यांच्या निर्देशानुसार संबंधित शौचालय तात्काळ सील करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बानोद यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अर्भक कोणी आणून टाकला की त्याच ठिकाणी प्रसूती झाली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक तपासात मृत अर्भक पुरुष जातीचे असून त्याचे वय सुमारे ८ महिने असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यतीने भ्रूण बाथरूममध्ये आणून टाकल्याची शयता पोलिसांनी व्यत केली आहे. अज्ञात व्यतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद
या प्रकरणानंतर रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगजनीनंतर फायर सिस्टीम निकामी असल्याचे समोर आले होते. आता ज्या इमारतीत मृत भ्रूण आढळले त्या इमारतीच्या एका बाजूचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे तसेच इतरही काही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिस करीत आहेत.
आठवडाभरात दुसरी गंभीर घटना
उल्लेखनीय बाब म्हणजे, तीन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या इमारत क्रमांक २ च्या दुसर्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, स्टोअर रूम व रेकॉर्ड रूम जळून खाक झाले होते. काही औषधे व महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट झाली होती. रेकॉर्ड रुमला लागूनच बाल रुग्ण विभाग होता. आग लागताच सर्व बाल रुग्णांना तात्काळ हलविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची चर्चा सुरू असतानाच ही नवीन घटना समोर आल्याने रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.