आर्वी,
Leopard death शिकारीचा पाठलाग करीत असताना बिबट्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना टाकरखेडा शिवारातील संजय देशमुख यांच्या शेतामध्ये शुक्रवार २६ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, आता याही शिवारात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकरखेडा येथील संजय देशमुख यांच्या शेतात विहीर असून, शुक्रवारी सायंकाळी एक मजूर विहिरीजवळ गेला असता त्याला विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मजुराने लागलीच शेतमालक संजय देशमुख यांना याबाबतची माहिती दिली. देशमुख यांनी शेतात जाऊन पाहणी केली तसेच वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवराले यांच्यासह पथक सायंकाळी ६.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. तपासणीअंती दोन दिवसांपूर्वी शिकारीचा पाठलाग करीत असताना दोघेही विहिरीत पडून गतप्राण झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. बिबट्यासोबत डुकराचे पिलुही विहिरीत मृतावस्थेत आढळल्याचे सांगितले.
विहिरीत बिबट Leopard death आणि डुकराचे पिलू मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे शिकारीचा पाठलाग करताना बिबट्याचा मृत्यू झाला असावा. पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी सोबत असून, बिबट आणि डुकराच्या पिलाला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दोघांचेही शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला, अशी माहिती आर्वी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवराले यांनी दिली.