वर्धा,
pigeon-pea-crop-destroyed : गेल्या पंधरवड्यात पडलेल्या थंडीमुळे तूर पिकांची वाढ चांगली झाली होती. पिवळी फुले आणि कोवळ्या शेंगांनी शेतशिवार बहरले असतानाच जंगली श्वापदांनी तीन एकरांतील तूर पीक पूर्णपणे फस्त केल्याची घटना खरांगणा (मोरांगणा) शिवारात घडली आहे. या घटनेमुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकर्यांना मोठा फटका बसला. सोयाबीन व कपाशी पिकांवर रोगराई आल्याने उत्पादन घटले. त्यामुळे तूर पिकावर शेतकर्यांची विशेष आशा होती. चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकर्यांनी अधिक खर्च करून फवारण्या केल्या. सध्या तूर पिकांना फुले व शेंगा लागल्या असतानाच वन्यप्राण्यांनी पिकांची नासधूस सुरू केली आहे.
जंगलालगत असलेल्या शेतांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्य श्वापदांचा वावर वाढला आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्री जागरण करीत आहेत. मात्र, डोळ्यादेखत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी असहाय्य झाले आहेत. खरीप हंगामातील तूर तसेच रबी हंगामातील हरभरा व गहू पिकांचीही नासाडी होत असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना नुकसान भरपाईसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. मात्र, ही प्रक्रिया किचकट असून मदत वेळेवर मिळत नाही. नुकसान मोठे असतानाही वनविभागाकडून अत्यल्प भरपाई दिली जात असल्याने शेतकर्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाईत वाढ करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
जंगलालगत आमची शेती आहे. दरवर्षी पिकांचे नुकसान होते. संरक्षणासाठी रात्रंदिवस जागरण करावे लागते. शेतात करंट लावला तरी वन्यप्राणी जुमानत नाही. मोठे नुकसान झाले तरी वनविभागाकडून तुटपुंजी भरपाई मिळत असल्याची प्रतिक्रीया शेतकरी तुकाराम पाटील यांनी दिली.