चोरीच्या टॅबसह आरोपी अटकेत

27 Dec 2025 19:09:07
गोंदिया, 
tablet-theft-gondia : रेल्वेगाडीतून प्रवाश्यांच्या साहित्याची चोरी करणार्‍या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने चोरीच्या टॅबसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी जवळच्या बिरसोला रेल्वेस्थानकावर करण्यात आली. विजय उर्फ लाला सोनलाल यादव, (२४) रा. वॉर्ड क्रमांक ६, जरेरा जगपूर, जि. बालाघाट (म.प्र.) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
JKL
 
रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे प्रवाशांचे संरक्षण आणि त्यांच्या साहित्यांची चोरी रोखण्यासाठी सतत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर रोजी, रेल्वे संरक्षण दल, गोंदियाचे प्रभारी निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली, मुख्य आरक्षक राहुल सिंग, आर.सी. कटरे आणि सहाय्यक उपनिरीक्षक आर.एस.बागडेरीया, सीआयबी गोंदियाचे सहाय्यक उपनिरीक्षक नासिर खान यांच्या पथकाकडून बिरसोला रेल्वेस्थानकावर संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून एक सॅमसंग टॅबलेट आढळून आले. यावर त्याची अधिक चौकशी केल्यानंतर, आरोपीने गुरुवार २५ डिसेंबर रोजी रेल्वेगाडी क्रमांक ६८८१८ गर्रा-गोंदिया मेमो लोकलमध्ये एका प्रवाशाकडून टॅब चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा चोरीचा टॅब जप्त केला. आरोपीला पुढील कारवाईसाठी जीआरपी गोंदियाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0