बुलढाणा,
uttam-kamble : जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत महाकवी वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आपल्या गायनातून, काव्यातून अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगितले. निरीक्षर असलेल्यांपर्यंत वामनदादांची गाणी आणि वाणी पोहोचल्याने जनप्रबोधन झाले. ते केवळ भीम शाहीर नव्हे तर एक क्रांतिकारी शाहीर होते. वामनदादा नसते तर आपल्याला बाबासाहेब समजायला शंभर वर्षे लागली असती. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा उदघाटक उत्तम कांबळे यांनी शनिवारी बुलढाणा येथे केले.

बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी (गर्दे वाचनालय सभागृह) येथे २७ व २८ डिसेंबर रोजी आयोजित लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे उदघाटन कथाकार विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली व स्वागताध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत उत्तम कांबळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी आ. संजय गायकवाड, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. आशुतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, साहित्यिक रमेश इंगळे चावरेकर, डॉ. विजयालक्ष्मी काकडे, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, भाऊ भोजने यांची विशेष उपस्थिती होती.
उदघाटक उत्तम काबंळे यांनी सांगितले भीमाने आपल्या सर्वांसाठी काय केले हे एखादा लेखक शंभर पानांचे पुस्तक लिहून सांगेल आणि पीएचडीमधूनही ते कळणार नाहीत पण, बाबासाहेबांच्या महान कार्याचा सार वामनदादांनी दोनच वायात सांगितला, तो म्हणजे ’उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. महाकवी, वामनदादा कर्डक हे पृथ्वीच्या पाठीवर एकमेव व्यक्ती होऊन गेले. आता दुसरा वामनदादा होणे नाही.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मराठी भाषा विभाग आणि लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच महाकवी वामनदादा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने संमेलनास प्रारंभ झाला. अंध, अपंग व मूकबधीर विद्यालयाच्या अंध विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून सर्वांना डोळस राहण्याची स्फूर्ती भरली. शाहीर डी.आर. इंगळे व कलासंचाने वामनदादांचे ’तुफानातले दिवे’ हे स्फूरण भरणारे गीत गायले. यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला.
महाकवींच्या संमेलनासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आ. संजय गायकवाड
वामनदादा कर्डक यांच्या नावाने महाराष्ट्रस्तरावर संमेलने आयोजित केली जावीत यासाठी आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिली. वामनदादांच्या कवितेतून प्रेरणा आणि लढण्याची शक्ती मिळते. त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी १४ एप्रिल रोजी माझ्याकडे केली गेली तेव्हा जन्मशताब्दीला पुतळा उभारू हा दिलेला शब्द मी पूर्ण केला. बुलढाणा येथे २५ कोटी रुपये किंमतीचे प्रशस्त नाट्यगृह उभारण्यात आले आहे. ते लवकरच सुरू करणार असून, या नाट्यगृहातच भव्यदिव्य साहित्य संमेलन घेऊन वामनदादांचे विचार राज्यभर पोहोचविण्यात येतील, असे वचनही आमदार गायकवाड यांनी यावेळी दिले.
प्रत्येक जिल्ह्यात शासनाने वामनदादांच्या नावाने संमेलन घ्यावे : रविकांत तुपकर
स्वागताध्यक्ष या नात्याने आपले विचार मांडताना रविकांत तुपकर म्हणाले, केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वामनदादा कर्डक यांच्या नावाने साहित्य संमेलन शासनाने घ्यावे, वामनदादांना एका चौकटीत बांधले गेले आहे. वंचित, कष्टकरी, शोषिक पीडितांचा आवाज बनलेल्या वामनदादांनी ’आमचा वाटा कुठं हाय हो’ असा सवाल विचारत ’टाटा बिर्ला तरतील, बाकी उपाशी मरतील’ असे भाकित वर्तविले होते. पंडित कानडे शास्त्री उद्यानातील वामनदादा कर्डक यांच्या स्मारकास अभिवादन करून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी संविधानाचा जागर करण्यात आला. या रॅलीचे बुलढाणेकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा केलेल्या लोककलावंतांसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कलावंतांनी पथनाट्य सादर केले. ग्रंथ प्रदर्शनी संमेलनस्थळी विविध ग्रंथांची प्रदर्शनी मांडण्यात आली आहे. डॉ. विजयालक्ष्मी काकडे, प्रा.डॉ. शिवाजी म्हस्के, मोतीराम कापरे, मधुराणी बनसोड यांच्या ग्रंथांचेदेखील मान्यवरांनी विमोचन केले. प्रास्ताविक साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले. याप्रसंगी शाहीर डी.आर. इंगळे, पंजाबराव मोरे, रवींद्र साळवे, शशिकांत जाधव यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शशिकांत इंगळे व राम हिंगे यांनी तर, आभार प्रदर्शन ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड यांनी केले