राजेश माहेश्वरी
आर्णी,
arni-nagar-parishad : आर्णी नगर परिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीत जवळजवळ सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. काँग्रेसचे नालंदा भरणे नगर परिषद अध्यक्ष पदावर विजयी झाले. तर 11 प्रभागांमधून निवडून आलेल्या 22 नगरसेवकांच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे नपत त्रिशंकू राजकारणाशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
नपत सत्ता स्थापन करण्यासाठी 12 नगरसेवकांची आवश्यकता आहेत. मात्र काँग्रेसने नप अध्यक्ष पदावर विजय मिळवला असला तरी त्यांचे आठच नगरसेवक विजयी झाले. राकाँ (अप)चे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदेचे चार, भाजपाने एक व शिवसेना उबाठाने एका जागी विजय मिळवला आहे. त्यामुळे नगर परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. यात शिवसेना शिंदे गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे.
यावेळी आर्णी नगर परिषद निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. फक्त काँग्रेसने माजी विधान परिषद सदस्य राकाँपा (शप)चे ख्वाजा बेग यांच्याशी युती करून निवडणूक लढवली होती.
आतापर्यंत आर्णी नगर परिषद आणि त्यापूर्वीच्या ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाला आपले खाते उघडता आले नव्हते. परंतु यावेळी भाजपाच्या चैताली विशाल देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडून येत खाते उघडले आहे. त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी, दोनवेळा नगरसेवक राहिलेल्या मंगला रमेश ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला.
सभेत बहुमताची किल्ली शिवसेना शिंदेकडे
शिवसेना शिंदे नेते संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांच्या नेतृत्वात निवडणूक ही लढवली. कुणाल मनवर नगराध्यक्ष पदासाठी दुसèया क्रमांकावर राहिले. तर चार नगरसेवक निवडून आले.
काँग्रेसकडे 8 नगरसेवक आहेत, राकाँ (अप)कडे 8, शिवसेना शिंदेकडे 4, भाजपाकडे एक आणि शिवसेना उबाठाकडे एक. काँग्रेसला आर्णी नगरपरिषदेपासून दूर ठेवण्यासाठी राकाँ (अप), शिवसेना (शिंदे) व भाजपा युती झाली तर त्यांच्याकडे 13 जागा होतात. तर काँग्रेसकडे 8, शिवसेना उबाठाकडे 1 अशा 9 जागा होता. त्यामुळे नगरपरिषदेत बहुमत मिळविण्यासाठीची किल्ली शिवसेना शिंदेकडे आहे.