नागपूर,
Gajanan Asole समाजाला प्रगतीसाठी चांगल्या लोकांची गरज असते. ती गरज पूर्णत्वास जावी याकरिता मुला-मुलींना संधी देण्याचे कार्य समाजाने इमानेइतबारे करावे, तेव्हाच सशक्त नागरिक आपण घडवू असे प्रतिपादन एसईसीएलचे स्वतंत्र संचालक अॅड. गजानन देवराव आसोले यांनी केले.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम जशपूर नगर यांच्या वार्षिकोत्सवात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा समन्वयक नरेंद्र सिन्हा, प्राचार्य नरेंद्र कुमार, वाणिज्य मंत्री ओ.पी.चौधरी, सुभाष बडोले, पंडीराम मंडावी, हेमचंद मांझी उपस्थित होते. वार्षिकोत्सव आणि स्थापना दिनाच्या अनुषंगाने पार पडलेल्या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने क्रीडा स्पर्धा वार्षिकोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली. शिवाय लोकगीत स्पर्धा, लोकवाद्य नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली. यातील ज्या मुला-मुलींनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले, त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रत्येक मुलात काही तरी सुप्त गुण दडलेले असतात. त्या गुणांची पारख शाळेतील शिक्षकांनी करावी अन् समाजाने त्यांना प्रोत्साहित करावे असेही मत अॅड. गजानन आसोले यांनी मांडले. वार्षिकोत्सवात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.