ग्रामीण भागात ग्राहक चळवळ प्रभावी होणे गरजेचे : डॉ. नारायण मेहरे

28 Dec 2025 21:05:39
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
narayan-mehre : सर्वसामान्य ग्राहक वर्गाचे जागरणं करण्यासाठी ग्राहक पंचायतीचे काम शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पोहोचण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी येथे केले. ग्राहक पंचायतीची विदर्भ प्रांत कार्यकारिणीची बैठक यवतमाळच्या मातोश्री वृद्धाश्रमात पार पडली. बैठकीच्या समारोपप्रसंगी डॉ. मेहरे बोलत होते. पश्चिम क्षेत्रीय संघटक नितीन काकडे, उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, विदर्भ संघटक अभय खेडकर, सचिव चारुदत्त चौधरी, जिल्हाध्यक्ष अनंत भिसे यावेळी मंचावर उपस्थित होते.
 
 
 
y28Dec-Mehare
 
 
 
क्षेत्रीय संघटक नितीन काकडे यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या समजून घेवून त्यावर अभ्यासपूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यकर्त्यांनी संघटनात्मक शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रांत संघटक अभय खेडकर यांनी विदर्भ प्रांतातील सर्व तालुक्यात संघटनेत क्रियाशील कार्यकर्ते जोडल्या गेले तरच ग्राहक जागृतीचे काम प्रभावीरित्या केले जावू शकते असे सांगितले.
 
 
बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर भारतमाता, स्वामी विवेकानंद आणि ग्राहक पंचायतीचे संस्थापक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अमरावती जिल्हाध्यक्ष अशोक हांडे यांनी ग्राहकगीत सादर केले. जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कैलास वर्मा यांनी प्रास्ताविक केले. हितेश सेठ, जितेंद्र बंगाले, शेखर बंड, संतोष डोमाळे, वीरेंद्र चौबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
 
 
दिवसभर चाललेल्या या बैठकीत संघटनात्मक विषयासोबतच प्रांतातील ग्राहकांच्या विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महावितरणच्या मनमानी कारभाराला आवर घालण्यासाठी कृषी ग्राहकांच्या समस्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचाही निर्णय घेण्यात आला. विद्युत कायद्यातील ग्राहकांवर होऊ घातलेल्या अन्यायकारक वीज सुधारणा विरोधात महावितरणच्या जनसुनावणीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वीज वितरण कंपनीचे कार्य समजून घेण्याच्या आवश्यकतेवर वाशीमचे सुधीर घोडचर यांनी भर दिला.
 
 
कार्यकर्त्यांच्या योग्य प्रशिक्षणासाठी संपूर्ण प्रांतात सर्वच जिल्ह्यात कार्यकर्ता अभ्यास वर्ग घेण्यात येणार असल्याचेही सचिव चारुदत्त चौधरी यांनी सांगितले. अकोल्याचे दिनेश पांडे, विजय बहाकर, वाशीमचे जुगलकिशोर कोठारी, प्रांजळ जैन, चंद्रपूरच्या नंदिनी चुनारकर, संगीता लोखंडे, वसंत वरहाटे, वर्धेचे सतीश देशमुख, किशोर मुटे, नागपूरचे संजय साळवे, प्रभाकर शिवणकर, तुकाराम लुटे, मधुकर पोटे, अमरावतीचे डॉ. चंदनसिंग राजपूत यांनी चर्चेत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. संजय जोशी यांनी म्हटलेल्या शांतीमंत्राने बैठकीची सांगता झाली. प्रांत पदाधिकाèयांसोबतच विदर्भातील विविध जिल्ह्यातील ग्राहक पंचायतीचे प्रमुख कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0