एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन मजूर ठार

28 Dec 2025 16:43:48
मूल,
tiger attack बांबू कटाईचे काम करताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पाऊण तासाच्या फरकाने झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोन मजूर ठार झाले. 27 डिसेंबरला ताडोबाच्या बफर क्षेत्रातील मामला व महादवाडी परिसरात या घटना घडल्या. प्रेमसिंग दुखी उदे (55, रा. बालाघाट), बुदसिंग श्यामलाल मडावी (41, रा. मुंडला, बालाघाट) अशी मृतकांची नावे आहेत. यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे.
 

tiger attack 
चिचपल्ली बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम सुरू आहे. वनविभागाने बालाघाट येथून कामासाठी मजूर बोलावले आहेत. काही मजूर महादवाडी बिटात तर काही मामला बिटात बांबू कटाईचे काम कऱीत आहेत. मामला बिटातील कक्ष क्रमांक 381 मध्ये शनिवारी दुपारी 3.45 च्या सुमारास बांबू कटाईचे काम करण्यात मग्न असलेल्या बुदशिंग मडावी यांच्यावर अचानकपणे वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना ताजी असताना व याबाबत चौकशी सुरू असतानाच पाऊण तासाच्या फरकाने या घटनास्थळापासून काहीच अंतरावर चिचपल्ली वानपरीक्षेत्रातील महादवाडी बफर झोन कक्ष क्रमांक 357 मध्ये प्रेमसिंग दुखी उदे यांच्यावर दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले.
या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग त्यांनीच कामाला लावलेल्या मजूरांना संरक्षण देऊ शकत नाही तर सर्वसामान्य नागरिकांना ते संरक्षण कसे देणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून, वनविभागाद्वारे तातडीने या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.
दिवसेंदिवस वनविभागाच्या विरोधात वातावरण तापत असून वनविभाग अजून किती नागरिकांचे नाहक बळी घेणार? प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष निर्माण झालेला आहे. घटनेची माहिती कळताच वनाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला व पीडिताच्या कुटुंबीयांना आर्थिक सानुग्रह मदत केली. पुढील तपास चिचपल्ली वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0