वर्धा,
pankaj bhoyar जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारत २ मधील दुसर्या माळ्यावर २३ रोजी लागलेल्या आगीच्या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतली आहे. रविवार २८ रोजी पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालय गाठून घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटनेला दोषी कोण, याचा शोध घेण्यासाठी अतिरित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनतकरी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती चौकशीअंती आपला अहवाल सादर करणार आहे. समितीने निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर करावा. समितीकडून कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्यास चौकशी समितीतील अधिकार्यांवरच चौकशी लावण्यात येईल, अशी तंबी यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आज रविवार २८ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून तेथील इमारत २ मधील बाल रुग्ण विभागाची पाहणी केली. सुरूवातीला सदर इमारतीतील दुसर्या माळ्यावरील ज्या स्टोअर रुममध्ये आग लागली त्या परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान रुग्णालय परिसरात काही ठिकाणी अस्वच्छता दिसल्याने त्यांनी जबाबदार अधिकार्यांना रुग्णालय परिसर स्वच्छ राहिलाच पाहिजे, याकरिता प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना सूचना देण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, अतिरित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनतकरी यांना दिले. २३ रोजी घडलेल्या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणेकडून इलेट्रीक व स्ट्रचरल ऑडिट करून घ्यावे, अशा सूचना दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, अतिरित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनतकरी आदींची उपस्थिती होती.
समितीला अजूनही आगीचे कारण कळले नाही
मंगळवारी घडलेल्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने एसीएस यांच्या अध्यक्षेत विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीत इलेट्रीक तज्ज्ञांचाही समावेश आहे. चौकशी समितीने आपली चौकशी सुरू केली असली तरी या समितीला ही आग नेमकी कशामुळे लागली याची ठोस माहिती अद्यापही गवसलेली नाही. लवकरच या समितीकडून निष्पक्ष चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.