वर्धा,
Pankaj Bhoyar : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस अजूनही लाखो सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासाचे प्रमुख साधन आहे. खेड्यापाड्यातील हजारो नागरिक आपल्या कामासाठी बसचा प्रवास करतात. जिल्ह्यातील अशा प्रवाशांचा प्रवास सुखकर, समाधानी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागास १४ ई-शिवाई वातानुकूलित बसेस प्राप्त झाल्या असून या बसेसचे लोकार्पण ना. पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा बसस्थानक येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक भगवान जगनोर, यंत्र अभियंता प्रताप राठोड, आगार प्रमुख युधिष्ठीर रामचवरे, सुनील गफाट, नगरसेवक अभिषेक त्रिवेदी, श्रीमती आडे, गणेश इखार, संजीव लाभे, दामोदर राऊत आदी उपस्थित होते.
बसेस जुन्या झाल्याने नवीन वातानुकूलित बसेस मिळण्याची विनंती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना केली होती. त्यांनी १४ ई-बसेस उपलब्ध करून दिल्या. पुन्हा किमान ५० वातानुकूलित बसेस उपलब्ध करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा सातत्याचा प्रयत्न आहे. तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करून दिला. वर्धासह सेलू येथे देखील नवीन बसस्थानक झाले. पवनार मुख्य मार्गावर देखील बसस्थानक होत असून जवळजवळ १०० प्रवासी निवारे मतदारसंघात पूर्ण केले आहे. बसेस देखील उत्तम दर्जाच्या आणि आरामदायी असल्या पाहिजे. बसस्थानक परिसरात देखील प्रवाशांसाठी चांगल्या सोई-सुविधा असल्या पाहिजे, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
प्रास्ताविक विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे यांनी केले. पालकमंत्र्यांनी फित कापून बसेसचे लोकार्पण केले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी वर्धा बसस्थानकापासून जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत नवीन ई-बसने प्रवास देखील केला.
या मार्गावरून धावतील ई-बसेस
वर्धा आगारात दाखल झालेल्या बसेस वर्धा-आर्वी-वरुड, वर्धा-राळेगाव-नागपूर, वर्धा-यवतमाळ-नागपूर-वर्धा, वर्धा-अमरावती-वर्धा, वर्धा-नांदेड-वर्धा, वर्धा-अकोला-वर्धा, वर्धा-हिंगणघाट-नागपूर या मार्गावर धावणार आहे.