यवतमाळ अर्बन बँक ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्काराने सन्मानित

28 Dec 2025 20:02:47
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-urban-bank : ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन व कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर सहकार मंथन कार्यक्रमाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते यवतमाळ अर्बन बँकेला ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 21 डिसेंबर रोजी देण्यात आला. या कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ग्रीन वर्ल्डचे गौतम कोतवाल, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मिलिंद काळे प्रामुख्याने उपस्थित होते. कॉसमॉस बँकेच्या सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, उपाध्यक्ष अजिंदरसिंह चावला आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
 

y28Dec-Pride 
 
 
‘बिना संस्कार, नहीं सहकार, विना सहकार, नहीं उद्धार’ हे तत्व आणि ‘वारसा विश्वासाचा’ हे ब्रिद सातत्याने जोपासत आलेल्या यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेने 31 मार्च रोजी 3300 कोटीच्या उलाढालीचा टप्पा पार केला असून महाराष्ट्रात सहकारी बँक म्हणून या बँकेचा नावलौकिक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या 30 शाखा असून त्याद्वारे ग्राहकांची सेवा केली जाते. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा बँकेचा खारीचा वाटा आहे. बँकेच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण हे बँकेचे प्रथम कर्तव्य आहे. त्याला अनुसरूनच बँकेच्या ग्राहकांना विमा सुविधा उपलब्ध व्हावी तसेच बँकेचे कर्ज सुरक्षित रहावे, याकरिता विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे.
 
 
बँकेने तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग घेऊन ग्राहकांसाठी एटीएम कार्ड, इलेक्ट्रीक बिल, फोन बिल, शासकीय चलान व इतर बिल विविपिएसद्वारे भरणा करणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच बँकेचे फेसबुक लिंक असून फेसबुकवर दिनविशेष टाकला जातो. बँकेचा आयटी विभाग हा अद्ययावत असून त्यामध्ये आवश्यक त्या आधुनिक सुविधा आहेत. बँकेचा डाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने तो क्लाउडवर स्थानांतरित करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, आपुलकीची ग्राहक सेवा आणि आधुनिक व्यवस्थापन प्रणाली या माध्यमातून बँकेची होत असलेली प्रगती या कार्याची दखल घेत, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल यवतमाळ अर्बन बँकेचे आणि संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Powered By Sangraha 9.0